कला महोत्सवात मातोश्री सरस्वती वाठ विद्यालय अव्वल

By Admin | Updated: September 28, 2015 00:24 IST2015-09-28T00:24:14+5:302015-09-28T00:24:14+5:30

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरअंतर्गत तालुकास्तरीय कला महोत्सव शुक्रवारी एकलव्य क्रीडा अकादमी येथे पार पडला.

Matoshree Saraswati Vath Vidyalaya topped the Arts Festival | कला महोत्सवात मातोश्री सरस्वती वाठ विद्यालय अव्वल

कला महोत्सवात मातोश्री सरस्वती वाठ विद्यालय अव्वल

नांदगाव खंडेश्वर : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान पंचायत समिती नांदगाव खंडेश्वरअंतर्गत तालुकास्तरीय कला महोत्सव शुक्रवारी एकलव्य क्रीडा अकादमी येथे पार पडला. या महोत्सवात दाभा येथील मातोश्री सरस्वती वाठ माध्यमिक विद्यालयाच्या चमूने प्रथम क्रमांक पटकाविला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षणाधिकारी अनिल कांबे तर उद्घाटक चित्रपट निर्माता संजय सिंगलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार बी. व्ही. वाहूरवाघ, गटविकास अधिकारी सुरेश गोहाड, गटशिक्षणाधिकारी वसंत मुंदे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीकृष्ण ढोमणे, मुख्याध्यापक शरद तिरमारे आदी उपस्थित होते. तालुकास्तरीय कला महोत्सवात ३१ विद्यालयाने सहभाग घेतला होता. यात विद्यार्थ्यांनी भौतिक क्षमतेसोबतच कलागुणांची चुणूक दाखविली. लोकनृत्य, लोकनाट्य, लोकसंगीत, लोकदृष्य सादरीकरणाच्या माध्यमातून पथनाट्य नृत्य सादर केले. यात दाभा येथील मातोश्री सरस्वती वाठ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित पेरणी करतानाचे नृत्य सादर करून दुष्काळात शेतकऱ्यांची निर्माण झालेली वस्तुस्थिती सादर केली. अस्मानी संकटाला घाबरुन न जाता बळीराजाने आत्महत्या करू नये, असा संदेश नृत्याच्या सादरीकरणातून देण्यात आला. हे नृत्य मुख्याध्यापक शरद तिरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बसविण्यात आले होते. निशा मोकासे, शीतल घोडेस्वार, साक्षी जामनिक, गायत्री इंगळे, साक्षी कडू, सारिका खंडारे, दिव्या मानापुरे, विशाखा श्रृंगारे, तेजस्विनी लढके, स्नेहा कोटांगळे, आचल आखरे, पायल इंगळे, निखिल उमाळे, प्रतीक इंगळे या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याचे सादरीकरण केले. सहायक शिक्षक नितीन तायडे, डी. एन. झेले, सुरेश मोलके, पी. डी. ठवकर, अभिजित गुढे, मिलिंद तायडे, गोवर्धन भेदोडकर, मदन खंडारे आदींनी अथक परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Matoshree Saraswati Vath Vidyalaya topped the Arts Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.