गणित शिक्षकांना मिळणार आॅनलाईन धडे
By Admin | Updated: January 9, 2017 00:16 IST2017-01-09T00:16:02+5:302017-01-09T00:16:02+5:30
राष्ट्रीय गणितीय स्थितीत सुधारणा होण्यासाठी विद्या प्राधिकरणाने (महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था) नवीन उपक्रम हाती घेतला आहे.

गणित शिक्षकांना मिळणार आॅनलाईन धडे
कार्यक्रम : ‘युनिसेफ’सोबत प्राधिकरणाचा करार
अमरावती : राष्ट्रीय गणितीय स्थितीत सुधारणा होण्यासाठी विद्या प्राधिकरणाने (महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था) नवीन उपक्रम हाती घेतला आहे. खासगी आणि शासकीय शाळांमध्ये प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर गणित शिक्षकांना आॅनलाईन धडे दिले जाणार आहे.
गणित विषयांचे प्रगत ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी २० प्रशिक्षक नेमले असून ते गणिताच्या पूर्णवेळ शिक्षकांना आॅनलाईन धडे देणार आहे. सहा महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी विद्या प्राधिकरणाने युनिसेफसोबत करार केला आहे. मार्गदर्शक प्रशिक्षक हे गणित विषयाच्या पूर्णवेळ शिक्षकांना वेबकॉम, ई-मेलद्वारे संवाद साधणार आहे. त्यामुळे गणित शिक्षकांना त्यांच्या संदर्भ साहित्य आणि वैयक्तिक माहितीचे नियोजन करता येणार आहे. दृकश्राव्य साधने उपलब्ध केल्यामुळे एकादी संकल्पना लवकर समजण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे शिक्षकांना गणिताचे धडे तर मिळणारच आहेत. याशिवाय राष्ट्रीय गणितीय पाहणीत पहिल्या क्रमांकावर येण्यास मदत होणार आहे. वाढत्या स्पर्धेमुळे गणित विषयांचे अनेकदा शिक्षकांना अडचणी सोडविणे कठीण होते. मात्र आॅनलाईन प्रशिक्षणामुळे वेळीच मार्गदर्शन मिळणार असल्याने ते सोयीचे होणार आहे. गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांमध्ये विद्यार्थी मागे राहत असल्याचे यापूर्वी झालेल्या सर्वेक्षण आणि निकालानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. गणित विषय म्हटले की विद्यार्थ्यांना थोडासा कंटाळा येतो. मात्र विद्या प्राधिकरणाने विद्यार्थी, शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी गणित शिक्षकांना तज्ज्ञांचे आॅनलाईन मार्गदर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)
गणित विषयांच्या शिक्षकांची यादी मागविली
खासगी व शासकीय शाळांमध्ये पूर्णवेळ गणित विषयांच्या शिक्षकांची यादी महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने मागविली आहे. शिक्षण उपसंचालकांकडे त्याअनुषंगाने पत्र प्राप्त झाल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा उपक्रम गणित शिक्षकांसाठी अतिशय लाभदायक ठरणारा आहे.
गणित विषयांच्या शिक्षकांना तज्ज्ञांकडून आॅनलाईन मार्गदर्शन मिळणार असल्याने ही बाब भविष्यात विद्यार्थ्यांसाठी स्तुत्य ठरणारी आहे. अद्यापपर्यंत वरिष्ठांचे पत्र प्राप्त झाले नाही. मात्र तसे पत्र आल्यास त्वरेने अंमलबजावणी केली जाईल.
- सी. आर. राठोड, शिक्षणाधिकारी, माध्यमिक