बिबट्याशी होऊ शकतो सामना
By Admin | Updated: September 30, 2014 23:29 IST2014-09-30T23:29:08+5:302014-09-30T23:29:08+5:30
वडाळी वनपरिक्षेत्रातील जंगलात चार ते पाच बिबट असल्याचा दावा वनविभागचा आहे. अश्या परिस्थितीत जंगलात फिरणाऱ्यांचा बिबटाशी कधीही सामना होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी

बिबट्याशी होऊ शकतो सामना
जंगलात फिरणे धोक्याचे : दिल्लीच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
वैभव बाबरेकर - अमरावती
अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रातील जंगलात चार ते पाच बिबट असल्याचा दावा वनविभागचा आहे. अश्या परिस्थितीत जंगलात फिरणाऱ्यांचा बिबटाशी कधीही सामना होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. दिल्लीतील प्राणीसंग्रहालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होवू नये याकरिता आता जंगलात विनापरवानगीने बिनधास्त फेरफटका मारणे धोक्याचे ठरु शकते.
दिल्ली येथील प्राणी संग्रहालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती जंगल परिसरातही होवू शकते. त्यामुळे जिल्ह्यावासीयांनी सावध राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील मेळघाटच्या जंगलात वाघ, बिबट व अन्य वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. अमरावती शहरानजीकच्या जंगलात बिबट, तडस, कोल्हा व रानडुक्कर या वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. अनेकदा नागरिकांना जंगलातील मार्गावर बिबट्याचे दर्शन घडले आहे. वडाळी वनपरिक्षेत्रात असलेले चार ते पाच बिबट अन्न व पाण्याच्या शोधात अनेकदा शहरलगत आढळून आले आहेत. काही वर्षांपूर्वी शहरातील रविकिरण कॉलनी परिसरात एका घरातील बाथरुममध्ये बिबट दडून बसला होता. मोठ्या शिताफीने त्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले होते. त्यामुळे बिबट नागरीवस्तीच्या सभोवताल आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वडाळीच्या जंगल मार्गाने दररोज शेकडो नागरिक प्रवास करतात. अनेक जण निसर्ग भ्रमंती करण्याकरिता जंगलात जातात. तर काही जण मौजमस्तीच्या दृष्टीने जंगलात जातात. मात्र जंगलात बिनधास्त फिरणे जीवघेणे ठरु शकते याची पुसटशी कल्पनाही नागरिकांना नसते. मात्र हिंस्त्र पशुंशी सामना होवू शकतो.