अपघातप्रवणस्थळासाठी 'मास्टर प्लॅन'

By Admin | Updated: March 8, 2017 00:16 IST2017-03-08T00:16:48+5:302017-03-08T00:16:48+5:30

शहरातील वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक 'मास्टर प्लॅन' आखणार आहे.

'Master plan' for accident | अपघातप्रवणस्थळासाठी 'मास्टर प्लॅन'

अपघातप्रवणस्थळासाठी 'मास्टर प्लॅन'

पोलीस आयुक्तांची दखल : स्पॉट व्हिजिट देऊन अभ्यासपूर्ण नियोजन करणार
अमरावती : शहरातील वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक 'मास्टर प्लॅन' आखणार आहे. स्पॉट व्हिजीट देऊन सर्व बाजूचे विश्लेषण करून अभ्यासपूर्ण नियोजन करण्यात येणार आहे. इर्विन चौकात बेशिस्त वाहतुकीने सोमवारी एका वृद्धाचा बळी घेतला. त्याअनुषंगाने दखल घेत आयुक्तांनी शहरातील सर्वच अपघातप्रवणस्थळांची माहिती घेण्याचे निर्देश सहायक पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
शहरातील बेशिस्त वाहतुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे नाहक बळी जात आहे. गेल्या वर्षात शहरातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध मार्गावर तब्बल ५९३ अपघात घडले असून त्यामध्ये ४८७ नागरिक जखमी झाले आहेत. याच अपघातापैकी ८७ अपघातांमध्ये तब्बल ९१ नागरिकांचे बळी गेले आहे. पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपाई असे एकुण १२ अधिकारी व १८४ पोलीस कर्मचारी शहरातील वाहतुकीची धुरा सांभाळतात. मात्र, तरीसुध्दा वाहतुकीचा प्रश्न दिवसेदिवस वाढतच आहे. इर्विन चौकात घडलेला अपघात हा बेशिस्त वाहतुकीचा असून या मार्गाने जड वाहतुकीस बंद असतानाही वाहतुक सुरुच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातच यु-टर्न मारणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा धक्का लागल्याने केशव दाभणे यांचे मोपेड वाहन खाली कोसळले आणि क्षणातच त्यांच्या अंगावरून भरधाव ट्रक गेला. या अपघाताविषयी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी इतंभुत माहिती मागविली असून ते स्पॉट व्हिजीट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. शहरात किती अपघात घडले, कोणकोणत्या ठिकाणी घडले. यामध्ये कोणत्या घटनास्थळावर अपघात अधिक घडले आहेत, अशा आदीबाबीची माहिती घेऊन त्यावर अभ्यासपूर्ण नियोजन करण्याची तयारी पोलीस आयुक्तांनी केली आहे.

शहरात किती अपघात झालेत आणि ते कोणत्या ठिकाणी झालेत, याची माहिती मागवून त्याचे विश्लेषण केले जाईल. त्यानुसार स्पॉट व्हिजिट देऊन उपाययोजनांसंदर्भात प्लॅन आखला जाईल. अपघाताचे प्रमाण कमी कसे करता येईल, याकडे विशेष लक्ष ठेवण्यात येईल.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त.

Web Title: 'Master plan' for accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.