बी-टेकच्या विद्यार्थ्यांचा मास्टर मार्इंड प्लान
By Admin | Updated: September 16, 2014 23:24 IST2014-09-16T23:24:30+5:302014-09-16T23:24:30+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पूर्व परीक्षेची वेबसाईट हॅक करुन बिहार येथील बी-टेकच्या विद्यार्थ्यांनी हायटेक प्लॅन तयार करुन अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय

बी-टेकच्या विद्यार्थ्यांचा मास्टर मार्इंड प्लान
वेबसाईट केली हॅक : अनेक विद्यार्थ्यांना गंडविले
अमरावती : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पूर्व परीक्षेची वेबसाईट हॅक करुन बिहार येथील बी-टेकच्या विद्यार्थ्यांनी हायटेक प्लॅन तयार करुन अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात १० सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार पोलिसांनी उघड केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी बिहार येथील रहिवासी आदित्य रतनेश्वर झा (२८), अभिषेक सूर्यकांत कुमार (२६), पप्पू राजकुमार सिंग (२०), सुजितसिंग पीरेन्दरसिंग (२१), दीपक दुर्गोनंद झा व सुरदेवसिंग लाबहादूर सिंग यांना अटक केली आहे. हिमाचल प्रदेश येथील रहिवासी अविनाश चंदेल यांच्या मुलीच्या वैद्यकीय प्रवेशकरिता आरोपीला २२ लाख रुपये दिले होते. मात्र प्रवेश निश्चित न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस तपासानंतर आरोपीला अटक करण्यात आल्याची अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी पत्रपरिषदेत दिली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक गणेश अणे, प्रमेश आत्राम उपस्थित होते.
आरोपी बिटेकचे विद्यार्थी
हायटेक प्लान करणारे हे युवक उच्च शिक्षण घेत आहेत. आरोपींमधील दीपक झा हा फरिदाबाद येथील इंजिनीअरींग कॉलेजमध्ये बी-टेकचा विद्यार्थी आहे. सुरेदेव सिंग व अभिषेक कुमार हे दोघेही जयपूर येथील एका महाविद्यालयात बि-टेकचे शिक्षण घेत आहे. सुरजित सिंग हाही बी-टेक झालेला आहे, असे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले.
दोन मुख्य सूत्रधार
या घटनेतील मुख्य सूत्रधार आदित्य रतनेश्वर झा व दीपक झा असून या दोघांनी हा मास्टर मार्इंड प्लान आखला होता. त्यामध्ये अन्य चार जणांना सोबतीला घेऊन विद्यार्थ्यांना गंडविणे सुरु केले. यामध्ये अन्य उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना हाती घेऊन मेडिकल प्रवेशाचे आमिष दाखविले. येथील डॉ. पजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील डिनचा पीए म्हणून सांगत होता. पीए बनून त्याने अविनाश चंदेल यांच्याही पैशाची बोलणी केली होती. त्यावेळी आदित्य हा पीएच्या तोऱ्यातच चंदेल यांच्यासमोर आला होता. दीपकने चंदेल यांच्याजवळून पैसे स्वीकारले.