मेळघाटात मुसळधार; अनेक मार्ग बंद
By Admin | Updated: August 5, 2015 00:29 IST2015-08-05T00:29:19+5:302015-08-05T00:29:19+5:30
मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मेळघाटातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मेळघाटात मुसळधार; अनेक मार्ग बंद
चिखलदरा : मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मेळघाटातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले दुथडी भरुन वाहत असून चिखलदरा तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाल्याचे वृत्त आहे.
चिखलदऱ्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ५४.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. चिखलदरा-घटांग मार्गावरील जामून नाला येथील पुलावरुन पाणीवाहत असल्याने हे मार्ग बंद झाला. काटकुंभ-गांगरखेडा येथील खुर्शीनदी दुधडी भरुन वाहू लागल्याने हा मार्ग दुपारपर्यंत बंद होता. परतवाडा-धामणगाव मार्ग चिखलदरा मार्ग सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद होता.
मंगळवारी दिवसभऱ्यात १७५ मि.मी.
मंगळवारी सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुसळधार पावसामुळे चिखलदरा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. चिखलदऱ्याची स्थित अप्पर प्लेटो येथील जलमापन केंद्रावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत १७५ मि.मी. पावसाची नोंद झाली. एकूण ७७१ मि.मी. पाऊस आज तारखेपर्यंत झाला आहे. रात्री उशिरापर्यंत सतत पाऊस सुरू होता. या संततधार पावसामुळे ढगफुटीची अनुभूती चिखलदरावासीयांना झाली.
कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता
पूर्व मध्यप्रदेश आणि लगतच्या विदर्भावरील ठळक कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होऊन त्याचे रुपांतर ‘डीप्रेशन’मध्ये झाले आहे. ते पूर्व मध्यप्रदेश आणि छत्तीसगड जवळपास स्थिरावले आहे. (जबलपूरवरुन ७५ कि.मी. वर) हे वादळ पश्चिम, दक्षिण, पश्चिम (नैर्ऋत्य) दिशेने सरकत असून हळूहळू याची तीव्रता कमी होऊन त्याचे रुपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. मान्सूनची धुरा भटींडा, दिल्ली, ग्वालीयर, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड मार्गे बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पंजाब आणि सभोवताल ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे आहेत. यामुळे विदर्भात काही ठिकाणी ४ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीची शक्यता आहे. ५ आॅगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊ स पडण्याची शक्यता असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.