चार तासापूर्वी झालेल्या वादातून दुपारी घडले हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:59+5:302021-07-08T04:10:59+5:30
अमरावती : लुंबिनीनगरात दुपारी १२ वाजता झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान चार तासांनी युवकाच्या हत्येत झाले. जुन्या वैयनस्यावरून ऋत्विक बेलेकरची ...

चार तासापूर्वी झालेल्या वादातून दुपारी घडले हत्याकांड
अमरावती : लुंबिनीनगरात दुपारी १२ वाजता झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान चार तासांनी युवकाच्या हत्येत झाले. जुन्या वैयनस्यावरून ऋत्विक बेलेकरची चाकूने भोसकून मंगळवारी हत्या करण्यात आल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांच्या तपासात पुढे आले.
हत्येपूर्वी मृत व आरोपींमध्ये दुपारी १२ च्या सुमारास किरकोळ वाद झाला. त्यानंतर चार तासांनी दुपारी ४ वाजता दरम्यान आरोपींनी संगनमताने त्या युवकाची मृताच्या घरासमोर हत्या केल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली. सहा पैकी पाच आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
ऋत्विक नीळकंठ बेलेकर (१८, रा. लुंबिनीनगर) असे मृताचे नाव आहे. अक्षय उत्तम शिंदे, मंगेश निरंजन पवार, नीलेश घनश्याम पवार, गोपाळ मुधोळकर, पवन चौधरी (सर्व रा. वडरपुरा) अशी आरोपींची नावे असून, खुनाच्या घटनेनंतर एका तासातच आरोपींना फ्रेजरपुरा पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले होते. सर्व आरोपी १८ ते २० वर्षीय असून सदर पाच जणांना पोलीस कोठडी मिळाली.
आरोपींनी गैरकाद्याची मंडळी जमवून २०१८ मध्ये दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी नाचण्याचे कारणावरून झालेल्या वादाचा रा. मनात धरून परत घटनेच्या दिवशी सुद्धा वाद केला. फिर्यादीच्या भाऊ मृतक याला धमकी देवून आरोपी यांनी घटनास्थळी येवून घरात बाहेर निघ असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली. त्यानंतर ऋत्विकवर चाकूने वार करून जीवानिशी ठार केले. आरोपीविरुद्ध कलम ३०२,१४३,१४७,१४८,१४९,२९४,५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. या संदर्भात मृताचा भाऊ फिर्यादी रोहन निळकंठ बेलेकर (२०, रा. लुंबीनिनगर) यांनी तक्रार नोंदविली होती. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक पुंडलीक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन मगर करीत आहेत.
बॉक्स:
ऋत्विक करीत होता गवंडी काम
मृत हा गवंडीकाम करीत होता. त्याला वडील नसून मोठा भाऊ व आई आहे. त्याच्यावरच घराची भिस्त होती. मात्र, जुना वाद पुन्हा उफाळून आल्याने ऋत्विकचा बळी गेला.