बाजार ओटे मटका व्यावसायिकांना विकले
By Admin | Updated: May 18, 2015 00:14 IST2015-05-18T00:14:52+5:302015-05-18T00:14:52+5:30
महापालिका खत्री कॉम्प्लेक्समध्ये प्रचंड अनागोंदी कारभार करुन बाजार व परवाना विभागाची लक्तरे वेशीवर ...

बाजार ओटे मटका व्यावसायिकांना विकले
बडनेरा, इतवारा बाजारातील प्रकरण : गंगाप्रसाद जयस्वाल यांचा कारनामा
अमरावती : महापालिका खत्री कॉम्प्लेक्समध्ये प्रचंड अनागोंदी कारभार करुन बाजार व परवाना विभागाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या गंगाप्रसाद जयस्वाल यांनी येथील इतवारा आणि बडनेऱ्यातील बाजार ओटे मटका व्यवसायिकांना परस्पर हस्तांतरित करण्याची किमया केली आहे. यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.
तहसील नजीकच्या खत्री कॉम्प्लेक्सची चौकशी सुरु असतानाच इतवारा बाजारातील ओटे प्रशासनाची परवानगी न घेता परस्पर हस्तांतरित केल्याची विश्वसनीय माहिती आहे. इतवारा बाजारातील जे बाजार ओटे परस्पर हस्तांतरित करण्यात आले त्यांचा पूर्वाश्रमीचा मटका व्यवसाय आहे. याच हेतुसाठी गंगाप्रसाद जयस्वाल यांना हाताशी धरुन बाजार ओटे नावे करुन घेतले आहेत. खरे तर हे बाजार ओटे छोट्या व्यावसायिकांना रोजगाराचे साधन म्हणून देण्याची नियमावली आहे. परंतु जयस्वाल यांना ‘माया’ जमा करण्याचा मोह आवरत नसल्याने त्यांनी बाजार व परवाना विभागच जणू विकून टाकण्याचा विडा उचलला होता की काय, असे दिसून येत आहे. बडनेऱ्यात सोमवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारात जागा शिल्लक राहिली नाही. त्यापैकी काही बाजार ओटे हे चक्क मटका व्यवसायिकांना देण्याची किमया जयस्वाल यांनी केली आहे. शिवणकाम करण्यासाठी छोटे दुकान थाटता यावे, याकरिता एका गरीब व्यक्तीने जयस्वाल यांना एक बाजार ओटा मागितला होता.
संकु लातील राखीव गाळे विकले
बडनेरा नवीवस्तीतील मौलाना आझाद संकुलात सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेच्या कार्यालयासाठी राखीव असलेले एक गाळे गंगाप्रसाद जयस्वाल यांनी परस्पर करारनामे करुन विकल्याची माहिती आहे. हे गाळे महिलांच्या विविधांगी योजना राबविताना कामी यावे, हा उद्देश प्रशासनाचा होता. परंतु जयस्वाल यांनी हा गाळा एका व्यवसायिकाला हस्तांतरित करुन लाखोंचा व्यवहार केल्याची माहिती आहे.
खत्री कॉम्प्लेक्स प्रकरणी चौकशी सुरु आहे. यात फौजदारी दाखल केली जाईल, यात दुमत नाही. परंतु बाजार ओटे वाटपात काही गैरप्रकार असेल तर तो शोधून काढताना पोलिसांत तक्रार दिली जाईल. बाजार ओटे परस्पर वाटप करणे ही गंभीर बाब आहे.
चंदन पाटील
उपायुक्त, महापालिका