बाजार समिती करणार माती, पाणी परीक्षण
By Admin | Updated: May 11, 2014 22:45 IST2014-05-11T22:45:51+5:302014-05-11T22:45:51+5:30
माती परीक्षणाशिवाय पारंपरिक पध्दतीने शेती करणे आता कठीण झाले आहे. यामुळे उत्पन्नात घट होताना दिसत आहे.

बाजार समिती करणार माती, पाणी परीक्षण
गजानन मोहोड -
माती परीक्षणाशिवाय पारंपरिक पध्दतीने शेती करणे आता कठीण झाले आहे. यामुळे उत्पन्नात घट होताना दिसत आहे. त्यामुळे शेतीला तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून माती, पाणी व पाने परीक्षण करुन शेतकर्याच्या मोबाईलवर एसएमएसव्दारे अहवाल देण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येणार आहे. जिल्ह्यामधील शेतकर्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नवीन तंंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकर्यांना अधिक उत्पादन मिळावे, यासाठी शेतामधील मातीचे परीक्षण करुन त्यामध्ये कुठल्या घटकांची कमतरता आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एकाच वर्षात दोन ते तीन वेळा पीक घेतल्याने मातीचा पोत व आरोग्य बिघडते. जमिनीमधील क्षारांचे प्रमाण वाढते. परिणामी पिकाला आवश्यक पोषक तत्त्व न मिळाल्याने उत्पादनात घट येते. रासायनिक खतांच्या वापरामुळेसुध्दा जमिनीचा पोत खराब होतो. हे जाणून घेणे शेतकर्यांसाठी आवश्यक आहे. यासाठी माती परीक्षण अत्यावश्यक ठरते. त्यामुळे बाजार समितीने माती नमुने परीक्षणाचा निर्णय कृषी अनुसंधान केंद्राच्या तांत्रिक मार्गदर्शनात घेतला आहे. यासाठी बाजार समितीच्या पहिल्या माळ्यावर स्वतंत्र कक्ष आवश्यक उपकरणांसह सुसज्ज आहे. यामध्ये माती, पाणी, पानांची तपासणी, तेले, प्रथिने, आर्द्रतेचे प्रमाण, बियाणे तपासणी, उगवण क्षमता तपासणीची सोय आहे.