बाजार समितीत माकडांचा हल्लाबोल, वेळ पाहून केली लूट
By Admin | Updated: July 29, 2015 00:11 IST2015-07-29T00:11:48+5:302015-07-29T00:11:48+5:30
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मतगणना जवळपास आठ तास चालली.

बाजार समितीत माकडांचा हल्लाबोल, वेळ पाहून केली लूट
अचलपूर : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मतगणना जवळपास आठ तास चालली. त्यापैकी किमान सहा तास मार्केट यार्डामधील शेकडो क्विंटल धान्यावर केवळ माकडांचा परिवारांसह कब्जा होता.
सोमवारी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीसाठी मतगणना बाजार समितीच्या चिली गोदामात पार पडली.
सकाळी ९ वाजतापासून सायंकाळपर्यंत हा कार्यक्रम अविरतपणे सुरु होता. बाजार समितीत शेकडो क्विंटल धान्य मार्केट यार्डमध्ये ठिकठिकाणी ठेवण्यात आले आहे. बाजार समितीच्या हमाल सोसायटी ते व्यापारी या सर्वच मतदार संघाची निवडणूक असल्याने सर्वांची हजेरी मतगणनेच्या चिली गोदामात होती.
मोठे पुढारी मात्र घरात बसून निवडणुकीचा निकाल स्थानिक चॅनलवर व मोबाईलवर पाहत होते. बाजार समितीचे धान्य यार्ड निर्मनुष्य होते आणि हाच फायदा शेकडो माकडांनी घेतला. (तालुका प्रतिनिधी)
खाओ रे गरिबो मनाओ दीपावली
शेकडो माकडांचे कळप आल्यावर त्यांनी धान्य भरलेल्या पोत्यांवर हल्लाबोल केला. पिलांसह माकडांचे कळप निर्भीडपणे पोत्यांवर बसून धान्य खात होते. बाजार समितीच्या मतमोजणीत पहिला निकाल हमाल तोलारी मतदार संघाचा लागला. पोपट घोडेराव यांच्या विजयाने सर्व हमाल मतदार मोठ्या जल्लोषात होते. तो जल्लोष धान्य यार्डकडे गेला. तेथे फटाके फोडण्यात आल्याने माकडांचे कळप सैरावैरा पळत सुटले. हा प्रकार पाहून फटाके दुसऱ्या जागी फोडण्याची सूचना केली आणि पोपट आया चुनके खाओ बंदरो, दाना चुनके,चा नारा लावला. खाओ रे गरिबो मनाओ दीपावली म्हणत माकडांनी पोटभर धान्य फस्त केले. यातील रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या मात्र बोलक्या प्रतिक्रिया होत्या. शेतकऱ्यांची लुटमार करणाऱ्यांना माकडांनी चांगलाच इंगा दाखविल्याचे शब्द पुटपुटत होते.