चक्क ‘प्रेस’ लिहिलेल्या कारमधून गांजा तस्करी; दोन पुरुष, तीन महिलांना अटक
By प्रदीप भाकरे | Updated: April 4, 2025 21:07 IST2025-04-04T21:07:47+5:302025-04-04T21:07:57+5:30
४० किलो गांजासह १३.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

चक्क ‘प्रेस’ लिहिलेल्या कारमधून गांजा तस्करी; दोन पुरुष, तीन महिलांना अटक
अमरावती : चक्क ‘प्रेस’ असे लिहिलेल्या महागड्या कारमधून होत असलेल्या गांजा तस्करीचा गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने पर्दाफाश केला. त्या कारसह ४०.३५ किलो गांजा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १३.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर घटनास्थळाहून दोन पुरुष व तीन महिला आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हे शाखाप्रमुख पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या पथकाने ४ एप्रिल रोजी नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाळकी रोडवर ही यशस्वी कारवाई केली. आरोपींनी तो गांजा ओडिसावरून आणला होता, तर ते बडनेरा येथे एकाकडे त्याची डिलिव्हरी देणार होते.
गुन्हे शाखा युनिट-२ चे पथक हे आयुक्तालय हद्दीत ४ एप्रिल रोजी सकाळी पेट्रोलिंग करीत असताना नांदगाव पेठ टोलनाक्याकडून वाळकी गावाकडे जाणाऱ्या रोडने एक काळ्या रंगाच्या चारचाकी कारमध्ये (एम. एच-४८-ए.-४९००) दोन पुरुष व तीन महिला गांजा बाळगून तो विक्रीकरिता व डिलिव्हरी देण्याकरिता येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी वाळकी रोडवर नाकाबंदी करण्यात आली. त्यादरम्यान ती कार थांबवून झाडाझडती घेण्यात आली. तेथून सय्यद राशीद सय्यद जमशीद (वय ३५), अरफाक दानिश शब्बीर पटेल (२३, दोन्ही रा. इस्लामी चौक, जुनी वस्ती, बडनेरा), मयुरी विजय चापळकर (१९), पूनम उमेश अंभोरे (३०) व निकिता सुभाष गायकवाड (२१, तिघेही रा. वडरपुरा, अमरावती) यांना वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
असा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून ८ लाख ६ हजार ६०० रुपये किमतीचा ४०.३५ किलो गांजा, दोन मोबाईल, पाच लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन व नगदी २३ हजार ५०० रुपये असा एकूण १३ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. आरोपींविरुद्ध नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वातील सहायक पोलिस निरीक्षक महेश इंगोले व त्यांच्या टीमने केली.