एकाच परमीटवर धावतात अनेक आॅटोरिक्षा

By Admin | Updated: August 8, 2016 23:57 IST2016-08-08T23:57:20+5:302016-08-08T23:57:20+5:30

प्रादेशिक परिवहन विभागातर्फे देण्यात आलेल्या एका परमीटधारकांना एक आॅटो चालविण्यास परवानगी असते.

Many autorickshaws run on the same permit | एकाच परमीटवर धावतात अनेक आॅटोरिक्षा

एकाच परमीटवर धावतात अनेक आॅटोरिक्षा

सामान्य चालकांच्या व्यवसायावर गदा : छुप्या मार्गाने गॅस रिफिलिंग
अमरावती : प्रादेशिक परिवहन विभागातर्फे देण्यात आलेल्या एका परमीटधारकांना एक आॅटो चालविण्यास परवानगी असते. मात्र, शहरातील काही ठिकाणी एकाच नावाच्या परमीटवर अनेक आॅटो चालविण्यात येत असल्याची ओरड काही आॅटो चालकांनी सुरू केली आहे. त्यामुळे परमीटधारक सर्वसाधारण आॅटोचालकांच्या व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली आहे. त्यातच छुप्या मार्गाने शहरातील काही परिसरात गॅस रिफिलिंग होत असल्याची माहिती एका आॅटोचालकांनी दिली.
जिल्ह्यात १३ हजार ५०० आॅटोचालक परमीटधारक आहेत. परमीट काढतेवेळी प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमावलीचे पालन करणे आॅटोचालकांना अनिवार्य असते. मात्र, शहरातील काही भागातील आॅटोचालक नियमांची पालमल्ली करीत असल्याचे आढळून येत आहे.
आॅटो चालकांना ड्रेसकोड देण्यात आला आहे. मात्र, बहुतांश आॅटोचालक पोशाख परिधान न करताच आॅटो चालवीत आहेत. त्यातच बडनेरा मार्गावर चालणारे चार ते पाच आॅटो एकाच परमीटधारकांचे असल्याचे आढळून आले आहे. सामान्य गोरगरीब आॅटोचालक परमीट घेऊन आॅटो चालवितात. मात्र, धनाढ्य आॅटोचालक एका नावाच्या परमीटवर अनेक आॅटो चालवीत असल्याचे अन्य आॅटोचालकांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे प्रादेशिक परिवहन विभागाचे परवाना शुल्कदेखील बुडत आहे.
हा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, याकडे प्रादेशिक परिवहन विभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आॅटोचालकाच्या या गोरखधंद्यामुळे सामान्य आॅटोचालकांच्या रोजगारीवर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

पाच वर्षांपूर्वी आरटीओकडून झाली कारवाई
पाच वर्षांपूर्वी एकाच परमीटवर अनेक आॅटो धावत असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार अशा आॅटोचालकांची यादी तयार करून तब्बल १५० आॅटोचे परमीट रद्द करण्यात आले. मात्र, त्यानंतर या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्यात न आल्याने परिस्थिती जैसे थे झाली आहे.

गॅस रिफिलिंगमुळे धोक्याची संभावना
शहरातील गोपालनगर व आदर्शनगरात छुप्या मार्गाने गॅस रिफिलिंग होत असल्याची माहिती काही आॅटोचालकांनी दिली. छुप्या मार्गाने होत असलेल्या या गॅस रिफिलिंगमुळे कधीकाळी स्फोट होण्याच्या भीतीने प्रवाशांमध्ये धडकी भरत आहे. याकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणी काही आॅटोचालकांनी केली आहे.

काही वर्षांपूर्वी अशा परमीटधारक आॅटोवर कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर हा प्रकार आढळून आला नाही. अशा आॅटोचे क्रमांक व तक्रार आल्यास कारवाई करू.
- श्रीपाद वाडेकर,
प्रादेशिक परिवहन अधिकारी.

Web Title: Many autorickshaws run on the same permit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.