परतवाडा : परतवाडा- अंजनगाव सुर्जी मार्गावरील सावळी दातुरा-हनवतखेडा गावालगत असलेल्या एका संत्रा मंडीला आग लागून सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास ही आग लागली. प्राथमिकदृष्ट्या ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची शक्यता अचलपूर पालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.ऋषी हरिश्चंद्र उपल (रा. वाघामाता परिसर, परतवाडा) यांच्या मालकीची अंजनगाव सुर्जी मार्गावर किसान संत्रा मंडी आहे. या मंडीतून संत्र्याची आयात निर्यातही केली जाते. त्यासाठी ४ हजारपेक्षा अधिक कॅरेटमध्ये संत्रा भरुन ठेवण्यात आला होता. नेहमीप्रमाणे रविवारी सायंकाळी संत्रा मंडीत काम सुरु असतानाच अचानक आगेचे लोळ उठले. अग्निशमन यंत्रणा पोहोचण्यापुर्वीत त्या आगीने संत्रा असलेली प्लास्टिकची सुमारे चार हजार कॅरेट कवेत घेतली. ती कॅरेट आगीत भस्मसात झाली. सोबतच एक ट्रकही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. प्राथमिक माहितीनुसार अंदाजे १६ लाख रुपये किंमतीचा ट्रक व २० ते २४ लाख रुपये किमतीचा संत्रा व कॅरेट पुर्णपणे जळाल्याने सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज संत्रा मंडीचालक ऋषी उपल यांनी वर्तविला. घटनास्थळावर अचलपूर नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी संदेश जोगदंड, त्यांचे सहकारी व अंजनगाव नगरपालिकेचे पथक पोहोचले. तीन बंबाच्या सहायाने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर आग आटोक्यात आली नव्हती. स्थानिक ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक संजय गायकवाड व सहकारी घटनास्थळी होते. याशिवाय मंडीतील काही सयंत्रे जळून खाक झाल्याची माहिती मिळाली.
मंडीला आग; चार हजार कॅरेट संत्रा, ट्रक खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST