२१ कर्मचार्यांवर ५५ गावांचा कारभार
By Admin | Updated: July 13, 2014 22:43 IST2014-07-13T22:43:23+5:302014-07-13T22:43:23+5:30
आसेगाव पोलीस स्टेशनची व्यथा: निवासस्थानांची पडझड, कर्मचार्यांवर अतिरिक्त भार

२१ कर्मचार्यांवर ५५ गावांचा कारभार
देपुळ : इतरांच्या समस्या मार्गी लावणार्या आसेगाव पोलिस स्टेशनलाच सद्यस्थितीत विविध समस्यांनी ग्रासले आहे. पोलिस निवासस्थानांची दुरवस्था झाली असून मनुष्यबळाचीही कमतरता जाणवत आहे. ५५ गावांच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी २१ कर्मचार्यांना पेलावी लागत आहे. आसेगाव पोलीस स्टेशनला ३६ कर्मचारी मंजूर असताना येथे केवळ २१ कर्मचार्यावर ५५ गावांचा कारभार ठाणेदार एस.व्ही. लष्करे यांना पाहावा लागत असल्याने त्यांना कायदा व सुव्यवस्था शांतता प्रदान करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या ५५ गावामध्ये रात्रीच्या गस्तीसाठी पोलीस लागतात. पोलीस स्टेशनमध्येही राखीव ठेवावे लागतात. यामध्ये भांडण, तंटे यांच्या फिर्यादी निपटारे, कार्यवाया, महिलांचा छेड, अवैध धंदे, सणवारानिमित्त वेळोवेळीचे बंदोबस्त कोर्टाचे प्रकरण, खात्याच्या डागा यातही कर्मचारी गुंततात अशा बिकट परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठाणेदाराला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आसेगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांसाठी बांधण्यात आलेले निवासस्थानामध्ये ठाणेदाराचे निवासस्थान वगळता सर्वच निवासस्थानाची पडझड झाली आहे. तसेच छतावरचे कवेलू फुटले.भिंती कोसळल्या, दार खिडक्या मोडल्या या निवासामध्ये झाडही वाढत आहेत. याची अवस्था भूकंप झाल्यासारखी झाली. त्यामुळे पोलिसांना येथे राहता येत नाही आणि आसेगावमध्ये त्यांना कुटुंब घेउन राहण्यासाठी जागाही भाड्याने मिळत नसल्याचा दावा पोलिस कर्मचार्यांनी केला आहे. भाड्याने जागा मिळत नसल्याचे कारण समोर करून शहराच्या ठिकाणावरून अपडाउन केल्याशिवाय पर्याय नाही. मुख्यालयी राहावे तर निवास नाही, बाहेरगावी राहावे तर मुख्यालयाचा नियम आहे. ईकडे आड तिकडे विहीर अशी आसेगाव पोलिसांची गत झाली आहे. याकडे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जातीने लक्ष घालून आसेगाव पो.स्टे.ला मंजुरातीप्रमाणे कर्मचारी द्यावे व निवासाची दुरुस्ती करावी, अशी जनतेची मागणी होत आहे.