‘मामी, आण ना अलकेशला !’

By Admin | Updated: October 7, 2015 01:23 IST2015-10-07T01:23:30+5:302015-10-07T01:23:30+5:30

‘अलकेश..असे का केलेस रे..’, ‘परत ये रे माझ्या भावा..’ ‘मामी तू म्हणाली होतीस ना, अलकेशला आणेल म्हणून, आण ना आता त्याला..’ ..

'Mami, and no luck!' | ‘मामी, आण ना अलकेशला !’

‘मामी, आण ना अलकेशला !’

बहिणीचा हृदयद्रावक आक्रोश : गहिवरले गुलाबबाबानगर, अनेक प्रश्न अनुत्तरितच
अमरावती : ‘अलकेश..असे का केलेस रे..’, ‘परत ये रे माझ्या भावा..’ ‘मामी तू म्हणाली होतीस ना, अलकेशला आणेल म्हणून, आण ना आता त्याला..’ अलकेशच्या थोरल्या बहिणीचा हा विदारक आक्रोश बघ्यांच्या अंगावर शहारे आणत होता.
शेजाऱ्यांच्या डोळ्यांमधील अश्रू थांबता थांबत नव्हते. नातलग त्यांच्या परीने या मायलेकींची समजूत घालीत असले तरी घराचे चैतन्य असलेला अलकेश आता कधीच परतणार नाही, ही जाणीव त्यांच्या आक्रोशात भर घालीत होती. अलकेश गेला. पण, अनेक प्रश्न मागे उरलेत. अभ्यासात तल्लख अलकेशने असा टोकाचा निर्णय का घेतला? समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेसाठी नेमके जबाबदार कोण? दारिद्र्य की कमकुवत मानसिकता. हा प्रश्नही उरला आहेच.
शहरातील गरिबांची वस्ती म्हणजे गुलाबबाबा नगर. येथे रामेश्वर मोहोड यांचे झोपडीवजा घर आहे. आचाऱ्याचे काम करुन ते कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पदरी दोन मुले. दहावीत विकास विद्यालयात शिकणारी नंदिनी आणि १३ वर्षांचा अलकेश. रामेश्वर मोहोड यांचा संसार कसाबसा चाललेला. अलकेश अभ्यासात तल्लख. नियमित शाळेत जाणारा. शिक्षकांचा आणि सवंगड्यांचाही लाडका. परिस्थितीने आलेले शहाणपण त्याच्याही अंगी होते. पण, सोमवारी काय झाले कुणास ठाऊक? आईने दहा रूपये दिले नाहीत आणि एक धपाटा मारला म्हणून अलकेशने चक्क आत्महत्या केली. अलकेश गेला, हे सत्य अद्यापही कुटुंबीयांच्या पचनी पडत नाही. मुख्याध्यापक, त्याला शिकविणारे शिक्षक आणि मित्र या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत.
विविध चर्चांना ऊत
अमरावती : सगळ्यांनाच अनेक प्रश्न पडलेत. पण, उत्तर मात्र कुणाकडेच नाही. पैसे देण्यास आईने नकार दिल्यानंतर रडत-रडत घराबाहेर गेलेला अलकेश शाळेच्या आवारात जाऊन आत्महत्या करेल, अशी पुसटशी कल्पनाही कोणालाच नव्हती. आईचा मार किंवा पैसे देण्यास मिळालेला नकार एवढा जिव्हारी लागेल, असेही कोणाला वाटले नव्हते. त्याची त्यावेळची नेमकी मनोवस्था काय होती?, आत्महत्येचे विचार आधीपासूनच त्याच्या मनात पिंगा घालत होते की काय?, त्याला नेमके शल्य कशाचे होते? अशा अनेक विषयांवर त्याचे नातलग आता चर्चा करीत आहेत.
शाळेतही हाच विषय चर्चेला आहे. अलकेशसारखा अद्याप मिसरूडही न फुटलेला चिमुरडा आत्महत्येच्या निर्णयाप्रत जातो म्हणजे नेमके चुकले कुणाचे? हा प्रश्न जागरूक नागरिकांना नक्कीच बोचणारा असेल.

Web Title: 'Mami, and no luck!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.