सामूहिक पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:59+5:302021-04-06T04:12:59+5:30

अमरावती : शहानूर प्रकल्पातून अंजनगाव सुर्जी, दर्यापूर व भातकुली तालुक्यांतील दोन शहरांसह १४६ गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन व ...

Make necessary proposals for strengthening the collective water supply scheme | सामूहिक पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव द्या

सामूहिक पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव द्या

अमरावती : शहानूर प्रकल्पातून अंजनगाव सुर्जी, दर्यापूर व भातकुली तालुक्यांतील दोन शहरांसह १४६ गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन व बळकटीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी येथे दिले.

पालकमंत्र्यांनी शहानूरला भेट देऊन पाहणी केली व पाणीपुरवठा योजनेचा बैठकीद्वारे आढावा घेतला. आमदार बळवंत वानखडे, सुधाकर भारसाकळे तसेच जलसंपदा, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर आराखड्यानुसार प्रस्तावित १४६ गावांसाठी अस्तित्वातील योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व भातकुली तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील अनेक गावे त्यात समाविष्ट आहेत. सन २०३१ मधील पाण्याची २५.०४ एमएलडी मागणी लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या उंच टाक्या, गुरुत्ववाहिनी आदींची दुरुस्ती, वाढीव वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव वेळेत द्यावेत. आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. शहरे व ग्रामीण परिसरात शुद्ध पेयजल उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसह अनेक नवी कामे हाती घेतली आहेत. ती वेळेत पूर्ण प्रशासनाने आवश्यक कामांचे वेळीच प्रस्ताव द्यावेत, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

-------------------

विविध गावांत उभारणार पाण्याच्या टाक्या

योजनेत पिंपळखुटा, बोरखडी खुर्द, देगूरखेडा, घातखेडा, काकरखेडा, नवथळ खुर्द, नालवाडा आदी गावांमध्ये पाण्याची टाकी प्रस्तावित आहे. त्यासाठी सुमारे ६२ लाख निधी, पाण्याच्या टाक्या, वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी सुमारे चार कोटी, तर नवीन डी.आय. किंवा एच.डी.पी.ई. गुरुत्ववाहिनी व वितरण व्यवस्थेसाठी ५ कोटी ५१ लाख, जलशुद्धीकरण केंद्रावर सीसीटीव्ही व तेथील रस्त्यावरील सौरदिव्यांसाठी सुमारे ११ लक्ष, पाणी वहन मोजणी यंत्रासाठी सुमारे १ कोटी, यांत्रिकी व वीजकामासाठी सुमारे ५२ लाख, पाच गावांत जलवाहिन्यांसाठी ६७.४३ लाख, जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्तीसाठी १ कोटी ३४ लाख अशा विविध कामांसाठी सुमारे १७ कोटी ८० लाख निधी प्रस्तावित आहे. योजना पूर्णत्वास जाण्यासाठी आवश्यक निधी वेळोवेळी उपलब्ध करून दिला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Make necessary proposals for strengthening the collective water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.