मेळघाटची आरोग्य सेवा सुरळीत करणार
By Admin | Updated: July 20, 2014 23:59 IST2014-07-20T23:59:26+5:302014-07-20T23:59:26+5:30
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी मेळघाटातील आरोग्य सेवा सुधारण्याकरिता रविवारी मेळघाटदौरा केला. याप्रसंगी त्यांनी सुपर स्पेशालिटी

मेळघाटची आरोग्य सेवा सुरळीत करणार
अमरावती : महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी मेळघाटातील आरोग्य सेवा सुधारण्याकरिता रविवारी मेळघाटदौरा केला. याप्रसंगी त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा सुधारण्याचे निर्देश दिले.
सुजाता सौनिक यांनी मेळघाटचा आढावा घेऊन थेट अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी केली. तेथील वॉर्ड व अतिदक्षता कक्षाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य निर्देश दिले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, सुपर स्पेशालिटीचे निकम, वीज वितरण कंपनी मोहोड यांच्यासह आदी आरोग्य सेवा देणारे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर सौनिक यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आढावा घेत तेथील सभागृहात दौऱ्यासंदर्भांत चर्चा केली. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवनिर्माण इमारतीमध्ये वीज उपलब्ध नसल्याचा मुद्यावर चर्चा केली. यावेळी तेथे उपस्थित वीज वितरणाचे अभियंता मोहोड यांच्याशी चर्चा करीत त्या म्हणाल्या की, विद्युत पुरवठा लगेच देणार नसाल तर आम्ही वीज हिसकावून घेऊ.त्यांनी मेळघाटमधील वीज पुरवठ्याबद्दल नाराजी व्यक्त केली व लवकरच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी सौनिक यांनी डॉक्टरांच्या कमतरतेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच तीन महत्त्वाच्या बाबी सर्वांसमोर मांडल्या. यामध्ये अत्यंत आवश्यक असणाऱ्या सुविधांमध्ये त्यांनी डॉक्टर, वीज व रक्त संकलन या तिन्ही बाबींवर प्रकाश टाकला व सर्व यंत्रणा सुधारण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. याकरिता डॉक्टर कंत्राटी पद्धतीने लावा. तसेच रक्त संकलनासाठी एनजीओची मदत घ्या, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)