शालेय विद्यार्थ्यांची आधार नोंदणी १०० टक्के करा
By Admin | Updated: August 4, 2015 00:15 IST2015-08-04T00:15:38+5:302015-08-04T00:15:38+5:30
महाराजस्व अभियानात अमरावती जिल्ह्यात विविध दाखले शिबिरे घेऊन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता ...

शालेय विद्यार्थ्यांची आधार नोंदणी १०० टक्के करा
महाराजस्व अभियान : जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांचे आवाहन
अमरावती : महाराजस्व अभियानात अमरावती जिल्ह्यात विविध दाखले शिबिरे घेऊन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता आवश्यक असलेल्या आधार कार्डची १०० टक्के नोंदणी करावी तसेच शैक्षणिक व अन्य कामांसाठी लागणाऱ्या विविध स्वरुपाच्या दाखल्यांकरीता आवश्यक ते सर्व अर्ज व कागदपत्राबाबत जनतेस माहिती द्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केल्या.
महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात १ आॅगस्टपासून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात १४ लोकाभिमुख घटक गावपातळीवर प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन येथील तहसिल कार्यालयाच्या वतीने ज्ञानमाता विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित आधार नोंदणी शिबिराचे उद्घाटन गित्ते यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक फादर सामी, उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, तहसिलदार सुरेश बगळे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, संस्थेचे पर्यवेक्षक उल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, शासनाच्यावतीने शालेय विद्यार्थी तसेच सर्व सामान्य नागरिक, शेतकरी यांना अधिकाअधिक सोयी सुविधा उपलबध करुन देण्यासाठी महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. खऱ्या नागरिकांच्या ओळखीसाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. शालेय जिवनापासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना उपयोगी आहे. विद्यार्थ्यांचा वेळ व श्रमाची बचत करण्यासाठी आधार नोंदणी शिबिरे जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. यासाठी इतरत्र फिरावे लागणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच आधार कार्डची नोंदणी केली जाणार आहे. ज्ञानमाता विद्यालयात १६४१ विद्यार्थी असुन या सर्वांची आधार कार्डसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. याशिवाय विद्यार्थ्यांना डोमेसिएल, जन्माचा दाखला आदी दाखले ही देण्यात येणार आहे.
उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे म्हणाले की, महाराजस्व अभियान शाळेत सुविधा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी ही त्यांच्या दारात जाऊन सुविधा पुरविण्यात येणार आहे.
महसुल प्रशासन हा शासनाचा आरसा असुन अभियान काळात अधिकाअधिक सोयी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ज्ञानमाताचे मुख्याध्यापक सामी यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम आपल्या विद्यालयात हा उपक्रम घेतल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानुन आगामी काळात विविध उपक्रम घेऊन अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे सांगितले. (प्रतिनिधी)