मजीप्राचा संप मिटला; आज होणार सुरळीत पाणीपुरवठा
By Admin | Updated: December 9, 2015 00:08 IST2015-12-09T00:08:27+5:302015-12-09T00:08:27+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पाण्यासाठी मंगळवारी हाहाकार माजला.

मजीप्राचा संप मिटला; आज होणार सुरळीत पाणीपुरवठा
अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे पाण्यासाठी मंगळवारी हाहाकार माजला. मजीप्राने वेळेवर पाणीपुरवठा न केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. बुधवारी या असंतोषाचा भडका उडण्याची चिन्हे असताना उशिरा रात्री संप मिटल्याने ही परिस्थिती निवळली आहे.
मंगळवारी शहरातील पाणी पुरवठा बंद असतो. त्यामुळे बुधवारी पाण्यासाठी वणवण होणार होती. जिल्ह्याभरात मंगळवारी पाणीपुरवठा झाला नसल्याची माहिती शहरवासियांपर्यंत पोहचल्याने गृहिणींची तगमग वाढली होती. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर तालुकास्तरावर काही ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आला. बहुतांश गावात पाणी पोहोचले नाही. अनेक गावातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. अनेक गावांमध्ये विहिरी आणि हॅन्डपंपांचा सहारा घ्यावा लागला. मात्र, उशिरा रात्री संप मिटल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
गावखेड्यातील नागरिकांची पायपीट
अमरावती : इतर पाणीपुरवठा योजनेच्या तुलनेत १५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर या संप वजा आंदोलनाचा मोठा परिणाम झाला. या संपामुळे गावस्तरावर पिण्याचा पाण्याचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरु केले होते. शहरासह चिखलदरा, दर्यापूर व अंजनगावची १५६ गाव पाणी पुरवठा योजना, अंजनगांवची ७९ गाव पाणी पुरवठा योजना, अमरावती, भातकुली, अचलपूर तसेच चांदूरबाजारची १०५ गाव पाणीपुरवठा योजना मजीप्रा मार्फत संचालित करण्यात येते.