मजीप्रा, वीज कंपनीत समन्वयाचा अभाव

By Admin | Updated: September 19, 2015 00:13 IST2015-09-19T00:13:07+5:302015-09-19T00:13:07+5:30

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीत समन्वयाचा अभाव असल्यामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

Majipra, lack of coordination in the power company | मजीप्रा, वीज कंपनीत समन्वयाचा अभाव

मजीप्रा, वीज कंपनीत समन्वयाचा अभाव

पाणीपुरवठ्यात दिरंगाई : वारंवार उद्भवतात कृत्रिम पाणीटंचाईचे प्रसंग
अमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीत समन्वयाचा अभाव असल्यामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळेच शहराला सोमवारी तब्बल दोन तास उशिरा पाणीपुरवठा करण्यात आला. यामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला.
जीवन प्राधिकरणकडून शहरातील ८० हजार ग्राहकांना दररोज ९५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. एखादवेळी पाणीपुरवठा बंद झाल्यास नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडते. दररोज नळ येत असल्याने बहुतांश नागरिक पाणी साठवून ठेवत नाहीत. अशाप्रसंगी पाणीपुरवठा न झाल्यास नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. महावितरणच्या कामामुळे वीजप्रवाह बंद झाल्यावर जीवन प्राधिकरणचे पाण्याचे पंपसुध्दा बंद होतात. पंप बंद झाल्यामुळे पाणीपुरवठ्यात खंड पडतो. विद्युत वितरण कंपनीची दुरूस्तीची कामे सुरु करण्याआधी जीवन प्राधिकरणला सूचना देणे आवश्यक असते. त्यांना सूचना मिळाल्यावर जीवन प्राधिकरणकडून नागरिकांना सूचना देणे अत्यावश्यक असते. मात्र, बरेचदा नागरिकांना सूचना न देताच जीवन प्राधिकरणद्वारे पाणीपुरवठा खंडित केला जात असल्याचा प्रकार घडतो.
काही दिवसांपूर्वी चांदूरबाजार येथे विद्युत महावितरणने फिडरवर दुरूस्तीची कामे केलीत. त्यावेळी जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा बंद राहील, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बहुतांश नागरिकांनी पाणी साठवून ठेवले होते. काही नागरिकांना पाण्यासाठी भटकंतीसुध्दा करावी लागली. मात्र, वीज वितरण कंपनीने वेळेवर निर्णय बदलला. तसेच सोमवारी तब्बल दोन तास उशिरा पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
याबाबत कोणतीही सूचना नसल्यामुळे नागरिकांची ताराबंळ उडाली होती. पहाटे लवकर उठून बहुतांश नागरिक पाणी भरतात, मात्र, सोमवारी दोन तास नळ उशिरा आल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागले.
रविवारी रात्री वीज कंपनीने जीवन प्राधिकरणाला सूचना न देता मोर्शीजवळ फिडर दुरूस्तीची कामे सुरू केली. त्याकरिता दोन तास विद्युत पुरवठा खंडित केला होता. मात्र, या कामामुळे जीवन प्राधिकरणचे पाण्याचे पंप बंद पडल्याने त्यांच्या पाणीपुरवठा नियोजनाची वेळ बदलली. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. अनेकांना पाणी मिळू शकते नाही. त्यांना इतत्र भटकंती करावी लागली.
वीज कंपनी व जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे नागरिकांना वेळेवर सूचना मिळत नाही. त्यामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)

वीज वितरण कंपनीची मोर्शी फिडरवर कामे सुरू असल्यामुळे पाण्याचे पंप बंद होते. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजित वेळा बदलल्या. वीज कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याआधी पूर्वसूचना दिली असती तर नागरिकांना वृत्तपत्रातून सूचना दिली असती.
- प्रशांत भामरे,
कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

Web Title: Majipra, lack of coordination in the power company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.