The main canal lining of the Khadakpurna project is proposed | खडकपूर्णा प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरण प्रस्तावित; २३ हेक्टरच्या भूसंपादनाचीही आवश्यकता
खडकपूर्णा प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरण प्रस्तावित; २३ हेक्टरच्या भूसंपादनाचीही आवश्यकता

अमरावती : बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे काम पूर्ण झाले. मात्र, सदर सिंचन प्रकल्पांतर्गत सिंचनाची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून तसेच पाणी बचतीसाठी उजव्या व डाव्या मुख्य कालव्याचे अस्तरीकरणाचे काम प्रस्तावित आहे. ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी येथील शेतक-यांनी केली आहे.

अस्तरीकरणाची कामे प्रगतीत असल्याचे जरी अधिकारी सांगत असले तरी ती अपूर्णावस्थेत आहेत. या प्रकल्पासाठी २३ हेक्टरच्या भूसंपादनाचीसुद्धा आवश्यकता असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकल्पासाठी उर्वरित भूसंपादनास विरोध असलेले लघु कालवे बंद नलिका वितरण प्रणालीत समाविष्ट करण्यात आले आहे. एकूण १३८७ हेक्टर क्षेत्रांपैकी १०३५.६० हेक्टर क्षेत्रातील कामे पूर्ण झाल्याचा जलसंपदा विभागाचा अहवाल आहे. प्रकल्पीय एकूण सिंचन क्षमतेपैकी १९२२ हेक्टर सिंचन क्षमता रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव नियामक मंडळाच्या बैठक क्रमांक ७० व ७४ मध्ये शासनाच्या अधीन राहून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. हा महत्त्वाचा प्रकल्प असून  बुलडाणा जिल्ह्यात मागील वर्षी भीषण पाणीटंचाई होती. यंदा तिन्ही प्रकल्पांत समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.

सदर प्रकल्पाची समाविष्ट करण्यात आलेली भाग एकची कामे ४२ टक्के पूर्ण झाली आहेत. जून २०२० अखेर उर्वरित कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. जूनअखेर एकूण २४८६४ हेक्टर सिंचन क्षमतेपैकी २२९४२ हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. १९२२ हेक्टरच्या सिंचन निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहे. त्याकरिता उर्वरित पीडीएनची प्रस्तावित कामे पूर्ण करणे अपेक्षित आहेत. खडकपूर्णा हा प्रकल्प बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात खडकपूर्णा नदीवर गारखेड गावाच्या खालील बाजूस करण्यात आला आहे.  

२२.९७ हेक्टरचे भूसंपादन प्रस्तावित
सदर प्रकल्पाकरिता ४६६९.१३ हेक्टरच्या भूसंपादन आवश्यक होते. त्यापैकी आतापर्यंत ४६४६.१६ हेक्टरचे भूसंपादन करण्यात आले असून, उर्वरित २२.९७ हेक्टरचे भूसंपादन प्रस्तावित आहेत. ९.४३ हेक्टरचे भूसंपादन हे सरळ खरेदीने व उर्वरित १३.५४ हेक्टरचे भूसंपादन अधिकाºयांमार्फत प्रस्तावित असल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने दिला आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकल्पासाठी १३७४.६० कोटींची चतुर्थ प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये जुलै २०१९ पर्यंत १३१५.३५ कोटींचा सदर प्रकल्पावर खर्च झाला. यासाठी २०१९-२० करिता ४०.८६ कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.
-----------
मुख्य कालवा अस्तरीकरणाचे काम मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. २३ हेक्टरचे उर्वरित भूसंपादन अंतिम टप्प्यात आहेत. ते झाल्यानंतर इतर उर्वरित कामे तातडीने मार्गी लावण्यात येतील. या प्रकल्पाचा संबंधित कार्यकारी अभियंत्याकडून आढावा घेतला आहे. 
- अनिल बहाद्दुरे, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अमरावती

Web Title: The main canal lining of the Khadakpurna project is proposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.