अचलपूरमधील लाकूड तस्करीतील मुख्य आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST2021-09-24T04:14:10+5:302021-09-24T04:14:10+5:30
फोटो - परतवाडा : अचलपूर पोलिसांनी लाकूड तस्करी प्रकरणातील वाहनासह सोडलेल्या मुख्य आरोपीस अखेर परतवाडा वनविभागाने अटक केली. ...

अचलपूरमधील लाकूड तस्करीतील मुख्य आरोपीला अटक
फोटो -
परतवाडा : अचलपूर पोलिसांनी लाकूड तस्करी प्रकरणातील वाहनासह सोडलेल्या मुख्य आरोपीस अखेर परतवाडा वनविभागाने अटक केली. चेतन सोनुकले (२३, रा. सुलतानपुरा, अचलपूर) असे त्याचे नाव आहे. अचलपूर पोलिसांनी सुलतानपुरालगत नदीवरील पुलालगत पकडलेले अवैध सागवान वाहून नेणारे वाहन सोडल्याची सविस्तर हकीगत वनविभागाला त्याने सांगितली. पण, वनविभागाला हव्या त्या वाहनाची माहिती त्याच्याकडून मिळाली नाही.
चेतन सोनुकलेने अचलपूर पोलिसांच्या तावडीतून सोडवून घेतलेले सागवान सुलतानपुऱ्यातील प्रेमदास दाभाडे यांच्याकडे ठेवण्यास दिले होते. हे लाकूड परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ६ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. तेव्हापासूनच वनविभाग चेतनच्या मागावर होते. यादरम्यान त्याने अचलपूर न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला. पण, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. तेव्हापासून तो पसार झाला होता.
यापूर्वीही अटक
अवैध सागवान तस्करी प्रकरणात नोव्हेंबर २०२० मध्ये चेतन सोनुकले व स्वप्निल हिरूळकर यांना परतवाडा वनविभागाने अटक केली. अवैध लाकडासह एक ऑटोरिक्षा व मोटर सायकल वनविभागाने या प्रकरणात ताब्यात घेतली आहे.
------------
पोलिसांची तक्रार केली दुसऱ्यानेच
अवैध सागवान लाकूड तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी चेतन सोनुकले असताना अचलपूर पोलिसांनी मोठी रक्कम घेऊन वाहन सोडल्याची तक्रार पोलीस अधिकाऱ्यांकडे स्वप्निल हिरूळकर याने केली होती. या अनुषंगानेही स्वप्निलचा या प्रकरणाशी असलेला संबंध चेतन सोनुकलेकडून वनविभाग जाणून घेत आहे.
--------------
अचलपूर परतवाड्यात तस्करी
मेळघाटसह लगतच्या मध्यप्रदेशातील व अंजनगाव वनपरिक्षेत्रातील अवैध सागवान लाकडाची तस्करी करण्याकरिता परतवाडा शहरात तस्करांचे हस्तक सक्रिय आहेत. हे हस्तक अवैध सागवान लाकूड घेणाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या मागणीनुसार लाकूड पुरवितात. अचलपूरमधील त्या लाकूड तस्करीत परतवाड्यातील अशाच काही हस्तकांची नावे पुढे आली आहेत. ही मंडळी अचलपूर, परतवाड्यासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध सागवान तस्करी करीत आहेत. या लाकूड तस्करीच्या अनुषंगाने ब्राह्मणवाडा थडी येथील काही मंडळीही चर्चेत आली आहे.
-----------
अचलपूरमधील प्रकरणाशी संबंधित मुख्य आरोपी चेतन सोनुकले यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा