माहुलीत झाली नाही विघ्नहर्त्याची स्थापना!
By Admin | Updated: September 25, 2015 00:54 IST2015-09-25T00:54:32+5:302015-09-25T00:54:32+5:30
टिळकांचा आदर्श घेत माहुलीवासीयांनी चार वर्षांपूर्वी ९ गणेश मंडळांचे विलिनीकरण करुन ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना साकार केली.

माहुलीत झाली नाही विघ्नहर्त्याची स्थापना!
चिमुरड्याच्या मृत्यूनंतरचा उद्रेक : गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते भूमिगत, गावात भय
नांदगाव पेठ : टिळकांचा आदर्श घेत माहुलीवासीयांनी चार वर्षांपूर्वी ९ गणेश मंडळांचे विलिनीकरण करुन ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना साकार केली. मात्र, साहिल डायरे मृत्यूप्रकरणानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या धरपकडीमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांसह गावातील नागरिकही भूमिगत झाले आहेत. त्यामुळे यावर्षी माहुलीत विघ्नहर्त्याची स्थापनाच झाली नाही.
तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत २०१२ साली माहुलीतील ९ गणेश मंडळांनी सामंज्यस्याची भूमिका घेऊन ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना राबविली. मागील तीन वर्षांपासून अतिशय आनंदात गावकऱ्यांनी बाप्पाचे स्वागत केले. परंतु गत महिन्यात २५ आॅगस्ट रोजी साहिल डायरे या चिमुकल्याच्या अपघाती निधनानंतर संतप्त माहुलीवासीयांनी एसटी व अग्निशमन वाहनाची जाळपोळ केल्याप्रकरणी पोलिसांनी गावकऱ्यांना दोषी धरून त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे भयभीत नागरिकांनी गावातून पळ काढला. परिणामी गावात यंदा विघ्नहर्त्याची स्थापनाच झाली नाही. पोलिसांच्या दशहतीमुळे ऐन गणेशोत्सवात गावात शुकशुकाट पसरल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावकरी अद्यापही भीतीच्या छायेत वावरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)