महायुतीने २७.३ तर बसपने पटकाविली २.६ टक्के मते
By Admin | Updated: May 19, 2014 23:04 IST2014-05-19T23:04:06+5:302014-05-19T23:04:06+5:30
सोळाव्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मतांची टक्केवारी घटली असून विभागातील विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीच्या पारड्यात २७.३ टक्के तर बसपने २.६ टक्के

महायुतीने २७.३ तर बसपने पटकाविली २.६ टक्के मते
जितेंद्र दखने - अमरावती सोळाव्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मतांची टक्केवारी घटली असून विभागातील विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीच्या पारड्यात २७.३ टक्के तर बसपने २.६ टक्के मते पटकाविली आहेत. विभागातील चार लोकसभा मतदारसंघात साधारणपणे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी लक्षात घेता २00९ च्या तुलनेत यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसून येते. विभागातील विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांना दहा हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्येसुध्दा मोदी लाट रोखायची कशी? हीच विवंचना सध्या आघाडीच्या नेत्यांना लागल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक अनेक अर्थानी ऐतिहासिक ठरली. देशाला आघाडी शासनाशिवाय पर्यायच नाही, असे म्हणणार्यांना लोकसभा निवडणुकीचे निकाल चपराक देणारे आहेत. खुद्द भाजपच्या अपेक्षा आणि कल्पनेपेक्षाही भरभरून मते मतदारांनी त्यांच्या पदरात टाकले. पुढे चार ते पाच महिन्यांत विधानसभा निवडणूक आहे. लोकसभेत महायुतीचा जनाधार वाढल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मचिंतन करावे लागणार आहे. लोकसभेच्या निकालातील आकडेवारीवरून मतांचा सर्वाधिक टक्का भाजपचा वाढल्याचे दिसून येते. त्या पाठोपाठ शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आप, मनसे, शेकाप याप्रमाणे इतर पक्षांना मिळालेल्या मतांचा विचार केला जाऊ शकतो. (प्रतिनिधी)