महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाला 'नॅक'चा 'अ' दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:15 IST2021-08-22T04:15:30+5:302021-08-22T04:15:30+5:30
फोटो - अमरावती : अस्मिता शिक्षण मंडळद्वारे संचालित शिलांगण रोडवरील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता समितीने ...

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाला 'नॅक'चा 'अ' दर्जा
फोटो -
अमरावती : अस्मिता शिक्षण मंडळद्वारे संचालित शिलांगण रोडवरील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता समितीने ३.०७ सीजीपीए देऊन 'अ' दर्जाचे मानांकन प्रदान केले. विशेष उल्लेखनीय म्हणजे सन २०१४ मध्ये महाविद्यालयाचे पहिले मानांकन झाले होते. गतवेळी महाविद्यालयाला नॅकचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाला होता.
महाविद्यालयाला भेट देणाऱ्या 'नॅक' समितीच्या चमूने देहरादून स्थित उत्तराखंड तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू नरेंद्र चौधरी, बालासोर (ओडिशा) येथील फकीर मोहन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू सव्यासाची पटनाईक, पी.सी.एफ.एस.डी. कॉलेज फॉर वूमन जालंधरचे प्राचार्य किरण अरोरा यांचा समावेश होता. ९, १० ऑगस्ट रोजी महाविद्यालयाला समितीने भेट दिली. नियामक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. नियमित विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि पालकांच्या दूरदृश्य प्रणालीने सभा घेतल्या तसेच महाविद्यालयाच्या प्रशासनिक कामकाजाच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करुन त्याचा अहवाल राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता समितीला सादर केला. त्यावरून 'नॅक'द्वारे महाविद्यालयाला ३.०७ सीजीपीए देऊन 'अ' दर्जा प्रदान करण्यात आला आहे.
प्राचार्य मीनल भोंडे (ठाकरे) यांच्या मार्गदर्शनाखाली आयक्यूएसी समन्वयक इंग्रजी विभागप्रमुख मरियम थॉमस, महाविद्यालयाचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नियमित विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले. अस्मिता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मुरलीधरराव भोंडे, सचिव मुकुल भोंडे, कोषाध्यक्ष अनिल भोंडे, सहसचिव राजेंद्र खारकर यांनी समाधान व्यक्त केले.