दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र
By Admin | Updated: September 29, 2014 22:51 IST2014-09-29T22:51:50+5:302014-09-29T22:51:50+5:30
काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्र राज्यावर तीन लाख कोटी रूपये कर्जाचा डोंगर उभा केला आहे. अशा विपरित स्थितीत राज्याचा अर्थसंकल्प कर्जाचे व्याज भरण्यात गुंडाळला जाईल की काय, अशी स्थिती

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र
भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ : नितीन गडकरी यांचा आरोप
तिवसा : काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्र राज्यावर तीन लाख कोटी रूपये कर्जाचा डोंगर उभा केला आहे. अशा विपरित स्थितीत राज्याचा अर्थसंकल्प कर्जाचे व्याज भरण्यात गुंडाळला जाईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र या आघाडी सरकारच्या भ्रष्ट्राचारामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांनी केला.
सोमवारी सायंकाळी तिवसा येथे आयोजित भाजपच्या जाहीरसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अरूण अडसड, प्रवीण पोटे, मतदारसंघाचे निरीक्षक व लखनौ येथील महापौर दिनेश शर्मा, पद्माकर पाकोडे, जिल्हा सरचिटणीस दिनेश सूर्यवंशी, विजय पुनसे, इंद्रायणी थेटे, रिपाइं आठवले गटाचे अनिल गोंडाणे, भाजपचे तिवसा तालुकाध्यक्ष नंदलाल गंधे, रूपेश ढेपे, अमरावती तालुकाध्यक्ष मोहन तळकीत, भातकुली तालुकाध्यक्ष मनोज लोखंडे, सुरेश मुंधडा, संघटन मंत्री शिवराय कुळकर्णी, तालुका सरचिटणीस शेखर नंदनवार आदी उपस्थित होते. यावेळी राजीव जामठे यांनी गडकरींच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.
सभेत पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राज्यात सिंचनावर ७० हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात सिंचन केवळ ०.०१ टक्क्यांनी वाढले, याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. राज्यात ८० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही. त्यांना जर वीज जोडणी मिळाली असती तर ८ ते १० लाख हेक्टर सिंचनाचे क्षेत्र वाढले असते. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला असता. विजेचे भारनियमनही सुरू आहे. वीज नाही म्हणून या भागात उद्योग यायला तयार नाही. एमआयडीसी ओस पडली. भूमिपुत्रांच्या हाताला रोजगार नाही, दररोज कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. गावात रोजगार नाही म्हणून लोक शहराकडे धाव घेत आहेत. गाव ओस पडेल की काय, अशी परिस्थिती काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारने आणली असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यात किमान १० हजार युवकांच्या हाताला रोजगार मिळेल असा उद्योग आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा झाला, असा आरोप गडकरींनी केला. प्रास्ताविक निवेदिता चौधरी, संचालन व आभार प्रदर्शन जयंत डेहणकर यांनी केले.