Maharashtra Election 2019 ; अपक्षांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 06:00 IST2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:53+5:30

जिल्ह्यातील निम्मे मतदारसंघ अपक्षांनी काबीज करण्याचा हा पहिला योग ठरला आहे. बडनेरा मतदारसंघातून बहुजनांचा बहुचर्चित चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरे जाणारे रवि राणा यांनी ‘हॅट्ट्रिक’ मारली. यापूर्वी बडनेरा मतदारसंघातून कोणीही तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले नाही.

Maharashtra Election 2019 ; Speak of the independents | Maharashtra Election 2019 ; अपक्षांचा बोलबाला

Maharashtra Election 2019 ; अपक्षांचा बोलबाला

ठळक मुद्देचार अपक्षांनी रचला इतिहासराणांना सर्वसामान्यांचे उमेदवार म्हणून पसंतीजिल्हा परिषद सदस्य भुयार झाले आमदार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात आठ मतदारसंघांपैकी चार अपक्षांनी काबीज केले. त्यांचा विजय राजकीयदृष्ट्या अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले बच्चू कडू आणि रवि राणा या दोघांनी आपल्या कार्यकाळात चांगली कामगिरी बजावली होती. त्यामुळे यंदा बडनेरा मतदारसंघातून रवि राणा व अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांना मतदारांनी पुन्हा कौल दिल्याचे वास्तव आहे. त्यातच यंदा नव्याने दोन अपक्ष मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल व मोर्शीतून देवेंद्र भुयार यांनी विधानसभेत ‘एन्ट्री’ मिळविली आहे. जिल्ह्यातील निम्मे मतदारसंघ अपक्षांनी काबीज करण्याचा हा पहिला योग ठरला आहे. बडनेरा मतदारसंघातून बहुजनांचा बहुचर्चित चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरे जाणारे रवि राणा यांनी ‘हॅट्ट्रिक’ मारली. यापूर्वी बडनेरा मतदारसंघातून कोणीही तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले नाही.
अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू हे चौथ्यांदा विजयी झाले. रुग्णसेवा आणि अपंगांची मदत यासाठी सर्वदूर प्रसिद्ध असलेले बच्चू कडू यांच्या ‘चौकारा’ने जिल्ह्याचे राजकारण पालटून गेले आहे. विजयानंतर मतदारसंघात ‘अपना भिडू बच्चू कडू’ या नाऱ्यांनी आसमंत कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला.
मोर्शी मतदारसंघाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. विधानसभेची पहिलीच निवडणूक लढवित असलेले अपक्ष देवेंद्र भुयार यांनी राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांना धोबीपछाड दिला. जिल्हा परिषद सदस्य असलेले देवेंद्र भुयार हे असून, त्यांची लढवय्या अशी ओळख आहे. मतदानाच्या दिवशी त्यांच्यावर हल्ला झाला. वाहन पेटवून दिले. भुयार यांना किरकोळ जखमा झाल्या होता. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेची मतदारसंघात जोरदार चर्चा झाली. देवेंद्र भुयार यांच्या विजयात ही बाबदेखील महत्वाची ठरली, असे मोर्शी मतदारसंघात चर्चिले जात आहे.
मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती संवर्गासाठी राखीव आहे. येथे गतवेळी भाजपने नवखा उमेदवार दिला, तर यंदा उच्चशिक्षित उमेदवार दिला. तथापि, मतदारांनी अपक्ष उमेदवार राजकुमार पटेल यांच्यावर विश्वास टाकला. त्यांनी एकतर्फी विजय मिळविल्याने मेळघाट मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वी मेळघाटचे दोनदा भाजपकडून विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे राजकुमार पटेल यांनी प्रहार समर्थित अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. आदिवासींचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पटेल यांनी आदिवासी बांधवांसोबत सातत्याने ठेवलेली ‘कनेक्टिव्हिटी’ त्यांच्या विजयासाठी फलदायी ठरली आहे.
जिल्ह्याच्या राजकीय सारिपाटावर बच्चू कडू, रवि राणा, देवेंद्र भुयार व राजकुमार पटेल हे चौघे आमदार म्हणून विधानसभेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असलेल्या सिंचन, पाण्याचा प्रश्न, रोजगार, नवीन उद्योगधंदे, शेतमालाला भाव, दिव्यांगाना कायमस्वरूपी रोजगार, रिक्त जागांचा अनुशेष, अचलपूर जिल्हा निर्मिती आदी महत्त्वाचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्यावर तोडगा काढण्याकडे त्यांना भर द्यावा लागणार आहे. मतदारांनी टाकलेला विश्वास ते कसा सार्थ करतात, हे पुढे दिसेलच.

सामान्य मतदारांनी दिली साथ
कधी नव्हे तो यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार अपक्ष आमदार निवडून आल्याने प्रस्थापित राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहे. अपक्षांचा विजय हे धक्कातंत्र मानले जात आहे. तथापि, त्यांच्या विजयामागे सामान्य मतदारांची शक्ती होती, हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. बडनेरा, मोर्शी, अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघांमध्ये सामान्य मतदारांनी अपक्षांच्या पाठीशी बळ उभे केले आहे. रवि राणा, बच्चू कडू, राजकुमार पटेल यांच्या विजयाने मतदारसंघातील समीकरणे नव्याने मांडावी लागतील, तर देवेंद्र भुयार हे जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी थेट राज्याच्या कृषिमंत्र्यांना अस्मान दाखविले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Speak of the independents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.