Maharashtra Election 2019 ; यशोमती ठाकूर यांच्या रॅलीला दमदार प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 06:00 IST2019-10-04T06:00:00+5:302019-10-04T06:00:37+5:30
यशोमती ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळावर नतमस्तक झाल्या. यानंतर त्यांनी तिवस्याकडे प्रयाण केले. यावेळी युवक काँग्रेसच्यावतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती, तर भातकुली, अमरावती, मोर्शी आणि तिवसा तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे त्यांच्या या रॅलीत सहभागी झाले होते.

Maharashtra Election 2019 ; यशोमती ठाकूर यांच्या रॅलीला दमदार प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : प्रचंड घोषणाबाजी अन् जल्लोषात तिवसा विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीच्या उमेदवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या रॅलीला लाभलेले समर्थन लक्षवेधी ठरले.
माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतोष महात्मे, महिला काँग्रेसच्या छाया दंडाळे, माजी नगराध्यक्ष गणेश राय, अजिजभाई, मुकद्दरखाँ पठाण, रमेश काळे, मुकुंदराव देशमुख, वीरेंद्रसिंह जाधव, हरिभाऊ मोहोड, मा.क.प.चे महादेव गारपगार, अनंतराव देशमुख, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष उषा उताणे, जि.प. सदस्य अलका देशमुख, प्रदीप राऊत, दिलीप काळबांडे, शिरीष मोहोड, राजकुमार विघ्ने, साहेबराव लसनापुरे, मनोज देशमुख, तिवसा नगरपंचायतचे अध्यक्ष वैभव वानखडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यशोमती ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळावर नतमस्तक झाल्या. यानंतर त्यांनी तिवस्याकडे प्रयाण केले. यावेळी युवक काँग्रेसच्यावतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली होती, तर भातकुली, अमरावती, मोर्शी आणि तिवसा तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे त्यांच्या या रॅलीत सहभागी झाले होते. तिवसा येथील सातरगाव रोडवरील एका शेतात प्रथम उपस्थित कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यानंतर याच स्थळापासून ते तिवसा तहसील कार्यालयापर्यंत रोड शो करण्यात आला. कार्यकर्त्यांकडून यशोमती ठाकूर यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात येत होती. विशेष म्हणजे, या रॅलीत महिला व युवती यांची संख्यासुद्धा लक्षणीय होती.
मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास!
तिवसा : रॅलीत सर्वत्र काँग्रेस पक्षाचे झेंडे आणि दुपट्टे घातलेले कार्यकर्ते यामुळे हा संपूर्ण परिसर व्यापून गेला होता.
जनतेचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि विश्वास हीच माझी खरी शक्ती आहे. महिलांचे हक्क आणि त्यांचे अधिकार याबाबतही मी सातत्याने आवाज उठविला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असो की सिंचन, पिण्याचे पाणी याबाबतच्या समस्या, त्या सातत्याने विधानसभेत उपस्थित केल्या. केवळ विकास करणे हेच माझे ध्येय आहे आणि त्यासाठी मला परत तुमच्या आशीर्वादाची गरज असल्याचेही यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.
या सरकारने विश्वासार्हता गमावली- भाजप सरकार केवळ लोकांना मूर्ख बनवत आहे. कोणतीही विकासकामे झाली नाहीत. विकासाचा केवळ आभास निर्माण केला आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत या सरकारला धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी केले.
धनगर समाजाची सरकारने फसवणूक केली-
भाजपा सरकारने धनगर समाजाची शुद्ध फसवणूक केल्याचे सांगितले. आरक्षण दिले नाही; केवळ धनगर समाजाच्या तोंडाला सरकारने पाने पुसली. एक हजार कोटीचे पॅकेज म्हणजे गाजराची पुंगी असल्याची टीका अमरावती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि धनगर समाजाचे नेते संतोष महात्मे याप्रसंगी म्हणाले.