संत गाडगे महाराज मंदिरात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद
By Admin | Updated: December 20, 2015 23:59 IST2015-12-20T23:59:43+5:302015-12-20T23:59:43+5:30
वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबांच्या ५९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त रविवारी समाधी मंदिर परिसरात अंध-अपंगांना अन्नदान व वस्त्रवाटप करण्यात आले.

संत गाडगे महाराज मंदिरात हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद
अमरावती : वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबांच्या ५९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त रविवारी समाधी मंदिर परिसरात अंध-अपंगांना अन्नदान व वस्त्रवाटप करण्यात आले.
याप्रसंगी आयोजित महाप्रसाद, अन्नदानाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. विनोद भुंबर यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले, तर संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते गरीब व गरजूंना वस्त्रवाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रसंत गुरुदेव महिला भजनी मंडळाने सादर केलेल्या भजनाने भाविक मंत्रमुग्ध झालेत. भजनी मंडळाच्या संयोजिका तांबूसकरबाई व त्यांच्या संचाने भजनांचे सादरीकरण केले. हभप तुळशीदास महाराज धर्माळकर यांच्या मधुर वाणीतून हरिनामाचा गजर करण्यात आला. ‘हरी बोल’ या गजराने भाविकांना खिळवून ठेवले. हभप ताराबाई गायकवाड यांनी गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला तर खंजेरी एक्स्प्रेस हृषीकेश रेळे यांनी खंजेरी भजनाचे जोरदार सादरीकरण केले. (प्रतिनिधी)
१४४ रक्तदात्यांनी केले रक्तदान
गाडगेबाबा रक्तदान समिती व संभाजी ब्रिगेडच्यावतीने गाडगेनगर स्थित संत गाडगेबाबा समाधी मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी १४४ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. शिबिरासाठी अतुल इंगोले व त्यांचे सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. संत गाडगेबाबांच्या समाजोेपयोगी उपक्रमांना अनुसरून हे शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी विशेष सहकार्य केले.