कांडलीत कोरोनाचा महाकहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:23 IST2021-03-13T04:23:23+5:302021-03-13T04:23:23+5:30
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोनाचा महाकहर बघायला मिळत आहे. दररोज कोरोना संक्रमित रुग्ण निघत आहेत. जिल्ह्यात ...

कांडलीत कोरोनाचा महाकहर
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोनाचा महाकहर बघायला मिळत आहे. दररोज कोरोना संक्रमित रुग्ण निघत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू कांडलीत आहेत.
कांडलीतील कोरोना संक्रमितांची व मृत्यूची शासकीय आकडेवारी आणि प्रत्यक्षात असलेले रुग्ण व घडलेले मृत्यू यात मोठी तफावत आढळून येत आहे. दरम्यान या कोरोना महामारीच्या साथीच्या आजाराकडे अचलपूर पंचायत प्रशासन, आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायतीचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे. कोरोना संक्रमित रुग्ण दररोज निघत असले तरी संबंधित प्रशासन अजूनही ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत नाही. यात प्रशासन सुस्त असून कोरोना संक्रमित मस्त आहेत. कोरोनाचा भार स्थानिक आशा वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर टाकून प्रशासन मोकळे झाले आहे. मात्र, कांडलीतील स्फोटक परिस्थिती त्या आशा वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आवाक्याबाहेर पोहचली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याकरिता गठित पथके केवळ नामधारी ठरले आहेत.
कांडलीत उपलब्ध आरोग्य कर्मचाऱ्यांकडे कांडलीसह अंबाडा, घोडगाव, कविठा येथीलही भार आहे. युद्धस्तरावर कुठल्याही परिणामकारक उपाययोजना कांडलीत कार्यान्वित नाहीत. कोरोना संक्रमितांवर कुणाचेही नियंत्रण नाही. नागरिक माहिती देत नाहीत. आवश्यक ते सहकार्य नागरिकांकडून मिळत नाही. आम्ही केवळ सरकारी माहितीच्या अनुषंगाने चालतो बाकी आम्हाला माहिती नाही. शासकीय माहितीनुसार रुग्ण शोधतो. कोविड सेंटरला नेऊन टाकतो. हायरिस्क, लोरिस्क काढतो. एवढेच आरोग्य विभागाचे काम असल्याचे पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. असे असले तरी कांडलीतील परिस्थिती आरोग्य विभागाच्या नियंत्रणाबाहेर आहे. हेही तेवढेच खरे.
बॉक्स
आरोग्य कर्मचारी बेपत्ता
कोरोनाचा हॉट स्पॉट बनलेल्या कांडलीत आरोग्य विभागाचे उपकेंद्र आहे. या उपकेंद्राकडे कांडली सोबतच अन्य तीन गावांचाही भार आहे. या उपकेंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) म्हणून डॉक्टर नियुक्त आहेत. पण हे डॉक्टर, आरोग्य अधिकारी काही महिन्यांपासून तेथून बेपत्ता आहेत. कांडलीवासी त्यांच्या सेवेपासून वंचित आहेत. प्राप्त माहितीनुसार आरोग्य विभागाने या समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांनी प्रतिनियुक्तीवर कांडली क्षेत्राबाहेर कोविड रुग्णालयात पाठविले आहे. कोरोनाच्या या महामारीत आरोग्य विभागानेच बेपत्ता केलेले हे डॉक्टर आता चर्चेत आले आहेत.
नुसत्या बैठका
कोरोनाच्या या महामारीत काही स्थानिक प्रशासकीय अधिकारी कांडलीत पोहचलेत. ग्रामपंचायतमध्ये बैठका घेतल्या. या बैठका केवळ नावालाच ठरल्यात. दोन-चार दिवस कांडलीत प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून परिस्थितीचे अवलोकन करण्याची आणि स्फोटक परिस्थिती नियंत्रणात आणण्याची आज गरज आहे. ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामविकास अधिकाऱ्यास सचिवांनी मुख्यालयी पूर्ण वेळ थांबण्याची आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी कांडलीला भेट देऊन स्फोटक परिस्थिती आणि तुटपुंज्या उपाययोजनांची पाहणी करणेही अत्यावश्यक झाले आहे.
—————————
पान २ चे लिड