महादेवखोरी मार्गाची दुरवस्था

By Admin | Updated: August 1, 2015 01:38 IST2015-08-01T01:38:10+5:302015-08-01T01:38:10+5:30

खड्ड्यांमध्ये साचते पाणी : डागडुजीचा अभाव, वाहनधारकांना होतोय त्रास, जबाबदार कोण?

Mahadevkhori road merges | महादेवखोरी मार्गाची दुरवस्था

महादेवखोरी मार्गाची दुरवस्था


खड्ड्यांमध्ये साचते पाणी : डागडुजीचा अभाव, वाहनधारकांना होतोय त्रास, जबाबदार कोण?
अमरावती : स्थानिक अमरावती शहरातील भरगच्च लोकवस्तीचा भाग म्हणजे यशोदानगर, जुना बायपास हा अतिशय वाहता रस्ता असल्यामुळे यशोदानगरातून सर्व ठिकाणी मुख्य जोडरस्ते गेलेले आहेत. यातीलच एक पूर्वेकडील महादेवखोरी मार्ग हा फारच वाहता रस्ता व दाट लोकवस्तीचा भाग आहे.
ऐन पावसाळ्याच्या मुहूर्तावर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मागील कित्येक वर्षांपासून या मुख्य रहदारी रस्त्याची साधी डागडुजीदेखील करण्यात आली नाही. त्यामुळे या रहदारी मार्गावरून वाहन चालविणे तर सोडाच, पण पायी चालणेसुध्दा कठीण झाले आहे. या प्रभागातील समस्त नागरिकांनी वेळोवेळी जनप्रतिनिधीकडे पाठपुरावा केला. परंतु काही फलित झाले नाही. एके काळच्या मुख्य डांबरी रस्त्याचे रुपांतरण आता ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे, पाण्याच्या डबक्यामुळे, रस्त्यावरील माती, गिट्टी उखडल्यामुळे, आपण खेडेगावात राहतो आहो की काय, असे नागरिकांना वाटायला लागले आहे.
सद्यस्थितीत पावसामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना, महाविद्यालयीन युवकांना, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना तसेच सर्व व्यावसायिकांना याचा खूप मन:स्ताप सहन करावा लागत आहे. जनप्रतिनिधींनी व महानगरपालिका प्रशासनाने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी व लवकरात लवकर रस्त्याची दुर्दशा थांबवून डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. परिसरातील नागरिक यामुळे हैराण झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा
शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करून ते चकचकीत करण्यात आले असले तरी अंतर्गत रस्त्यांची अवस्था मात्र अत्यंत वाईट आहे. यशोदानगर ते महादेव खोरीपर्यंतचा मार्ग हे त्याचे जीवंत उदाहरण आहे. हा संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. थोडासा जरी पाऊस आला तरी पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचून राहते. परिणामी वाहनधारकांना अडचण निर्र्माण होते. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांचा नीट अंदाज येत नसल्याने अनेकदा वाहनधारक या खडड्यांमुळे उसळून पडतात. अनेकदा या मार्गावर किरकोळ अपघात झाले आहेत. या रस्त्याच्या डागडुजीची मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अमरावती महापालिकेची आता ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल सुरू असताना ही स्थिती अपेक्षित नाही. आयुक्तांनी या समस्येकडे तत्काळ लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Mahadevkhori road merges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.