सालबर्डीतील दारुगुत्त्यांवर मध्य प्रदेश पोलिसांचे धाडसत्र
By Admin | Updated: August 27, 2015 00:30 IST2015-08-27T00:30:53+5:302015-08-27T00:30:53+5:30
श्रीक्षेत्र सालबर्डीत दारुविक्रीला उधाण आल्याचे वृत्त २४ आॅगस्टला लोकमतमध्ये प्रकाशित होताच मध्य प्रदेशच्या आठनेर पोलिस ठाण्यातील ...

सालबर्डीतील दारुगुत्त्यांवर मध्य प्रदेश पोलिसांचे धाडसत्र
प्रभाव लोकमतचा
मोर्शी : श्रीक्षेत्र सालबर्डीत दारुविक्रीला उधाण आल्याचे वृत्त २४ आॅगस्टला लोकमतमध्ये प्रकाशित होताच मध्य प्रदेशच्या आठनेर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सालबर्डी परीसरातील हातभट्टी दारु गुत्यावर धाड टाकली. पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हे नोंदविले.
श्रावण महिन्यात सालबर्डी येथील महादेवाच्या भुयारात पिंडीच्या दर्शनासाठी भाविक येतात. या संधीचा लाभ घेण्यासाठी थेट पहिल्या पायरीवर पूजा साहित्य, उपाहारगृह, चहापानाच्या टपरी लावून बसलेल्या दुकानातून विदेशी दारुसोबतच हातभट्टी दारुची विक्री केली जाते. भुयाराकडे जाणाऱ्या मार्गावरही अशीच दुकाने लावली आहेत. भुयारात पुरुष मंडळीच नव्हे तर महिलासुध्दा मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. दारु मुबलक असल्यामुळे, दारु पिवून, झिंगलेल्या स्थितीत पुरुष भक्त मंडळी भुयार मार्गावर आढळून येते. या प्रकाराचा महिलांना विशेषत: त्रास होतो. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या कारणामुळे निर्माण होतो. मध्य प्रदेशातील आठनेर पोलिसांच्या अखत्यारीतील मोर्शी पोलीस अवैध दारु विक्री थांबविण्यासाठी कोणतीही कारवाई करु शकत नाही. अमरावती जिल्हा पोलिस प्रशासनाने थेट बैतुल जिल्हा पोलिस अधीक्षकांशी संपर्क करुन या संदर्भात माहिती देऊन सालबर्डीतील हा प्रकार बंद करण्याची विनंती केल्याचे कळते. याच अनुषंगाने कालच आठनेर पोलीस ठाण्यातील दोन सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. एस. पटेल आणि रघुवंशी यांनी पो.कॉ. पंजाबराव खंजारे यांच्यासह सालबर्डी परिसरातील झुणकारी येथे हातभट्टीच्या दारु निर्मिती गुत्त्यावर धाड टाकली. पोलिसांच्या धाडसत्राला विरोध करण्यासाठी लोकांचा जमाव गोळा झाला होता, तथापि पोलिसांनी आग्नेयास्त्र त्यांचेवर रोखल्यावर ही मंडळी पळून गेल्याचे सहा पोलिस उपनिरीक्षक बी एस पटेल यांनी ’लोकमत’शी बोलतांना सांगीतले. या प्रकरणी पळून गेलेल्या तिघा आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगीतले. हे पथक सायंकाळ झाल्यामुळे आणि पर्यटक निघून गेल्यामुळे त्यांना अवैध दारु विक्री करणारे मिळाले नाही.(तालुका प्रतिनिधी)