गणेश वासनिकअमरावती : सध्या चीनमधील शांघाय येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत अमरावतीच्या मधुरा धामणगावकरने वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक प्राप्त करून इतिहास रचला आहे. शांघाय शहरात सुरू असलेल्या विश्व कप स्टेज-२ तिरंदाजी स्पर्धेत कंपाैंड प्रकारात अमेरिकेच्या कार्सन क्राह हिचा १३९-१३८ असा पराभव करून मधुराने वैयक्तिक सुवर्ण प्राप्त करून आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील आपल्या पहिल्या सुवर्णासह विश्वविजेती होण्याचा बहुमान पटकाविला. हा महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरला आहे.
शनिवारी सकाळी सांघिक स्पर्धेत रौप्य, तर मिश्र स्पर्धेत कांस्य पटकावून मधुराने शांघाय स्पर्धेत आपली छाप पाडली. मधुराच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंद व्यक्त केला जात असून, आगामी ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकण्याची आशा पल्लवित झाल्याची प्रतिक्रिया राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदूरकर व मधुराचे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांनी व्यक्त केली आहे.
अमरावतीकरांसाठी हा अतिशय आनंदाचा व अभिमानाचा क्षण असून, मधुराचे परिश्रम फळाला आले असल्याची प्रतिक्रिया मधुराचे वडील शैलेश धामणगावकर यांनी व्यक्त केली. शांघाय येथील स्पर्धेचा आजचा दिवस भारतासाठी फारच फलदायी ठरला. कंपाउंड प्रकारात भारताने तब्बल दोन सुवर्ण, दोन कांस्य व एक रौप्य अशी पाच पदकांची कमाई केली. त्यांपैकी तब्बल तीन पदके एकट्या मधुराने जिंकली, हे विशेष.
शनिवारी सकाळी मेक्सिकोविरुद्ध खेळल्या गेलेल्या कंपाैंड सांघिक अंतिम सामन्यात मधुरा धामणगावकर, ज्योती सुरेखा वेन्नम व चिकीथा तनिपारथीच्या भारतीय संघाला २२२-२३४ असे पराभूत होऊन रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. परंतु ऋषभ यादव, ओजस देवतळे व अभिषेक वर्माच्या भारतीय संघाने मेक्सिकोला अंतिम सामन्यात २३२-२२८ असे नमवून महिला विभागांतील पराभवाचा वचपा काढला व भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले.