निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप
By Admin | Updated: July 4, 2015 00:58 IST2015-07-04T00:58:01+5:302015-07-04T00:58:01+5:30
भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्पातील बाधित कुटुंबांना नजीकच्या कठोरा येथे भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे.

निम्नपेढी प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप
कठोरा येथे पुनर्वसन : आमदार, जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
अमरावती : भातकुली तालुक्यातील निम्नपेढी प्रकल्पातील बाधित कुटुंबांना नजीकच्या कठोरा येथे भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. आमदार रवी राणा, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या पुढाकाराने भूखंडाचे पट्टे मिळाल्याचा आनंद प्रकल्पग्रस्तांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळाला.
येथील बचत भवनात शुक्रवारी पार पडलेल्या कार्यक्रमाला आ. रवी राणा, जिल्हाधिकारी किरण गित्ते, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, उपजिल्हाधिकारी रामदास सिद्दभट्टी, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी अळणगाव, कुंड खुद, कुंड सर्जापूर, हातुर्णा व गोपगव्हाण येथील बाधितांना भूखंडाचे वाटप करण्यात आले. निम्नपेढी प्रकल्पाला शासनाने १२ आॅगस्ट २००४ रोजी प्रशासकीय मान्यता देवून २२ सप्टेंबर २००५ च्या कलम ११ नुसार प्रसिद्ध करण्यात आले होते. घोषित प्रकल्पांमुळे १५०० कुटुंबांचे पुनर्वसन करण्याला शासनस्तरावर मान्यता मिळाली होती. आ. सुनील देशमुख, माजी आ. बी.टी. देशमुख, संजय बंड, अळणगावचे सरपंच सुनंदा मेटांगे, दिलीप इंगोले आदींच्या प्रयत्नाने तेव्हा कठोरा येथे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार शासन, प्रशासन स्तरावर कार्यवाही करुन भूखंड वाटपाची प्रक्रिया पार पडली. ५५० लाभार्थ्यांपैकी २७२ लाभार्थी व नागरिकांना भूखंडाचे वाटप करण्यात आले. तसेच जुन्या घरांसाठी ११ लाख रुपये तर प्रकल्पग्रस्तांना एकरी १० ते १२ लाख रुपयाप्रमाणे मोबदला मिळणार, असे आ. राणा यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी भातकुली पंचायत समितीच्या सभापती संगीता चुनकीकर, उमेश ढोणे, शैलेंद्र कस्तुरे, आशिष गावंडे, गणेश पाचकवडे, प्रकाश खर्चान, राजू तेलमोरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)