ज्यूस विक्रेत्यांच्या गाड्यांवर प्रेमीयुगुलांचा वावर
By Admin | Updated: March 2, 2017 00:01 IST2017-03-02T00:01:19+5:302017-03-02T00:01:19+5:30
अंबानगरीत अनेक परप्रांतीय शितपेय आणि ज्यूस विक्रेते उन्हाळ्याची चाहुल लागताच डेरेदाखल झाले आहेत.

ज्यूस विक्रेत्यांच्या गाड्यांवर प्रेमीयुगुलांचा वावर
अमरावती : अंबानगरीत अनेक परप्रांतीय शितपेय आणि ज्यूस विक्रेते उन्हाळ्याची चाहुल लागताच डेरेदाखल झाले आहेत. शहरातील प्रमुख मार्गांवरील फुटपाथवर अनाधिकृत हातगाड्या लाऊन याठिकाणी शितपेयविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. परंतु रात्र होताच या गाड्यांवर प्रेमीयुगुलांचा राबता दिसतो. शहरातील अनेक जोडपी येथे बिनधास्तपणे तासन्तास बसलेली आढळून येतात.
अनेक हातगाड्यांवर तर सार्वजनिक ठिकाणी वर्तनाचे ििनय मोडून सर्रास अश्लिल चाळे होत असल्याचे चित्र आता नवीन राहिलेले नाही. त्यामुळे यामार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाच खाली मान घालावी लागते. शहरातील मालटेकडी परिसरात ज्यूस विक्रेत्यांच्या गाड्या दिवसभर उभ्या असतात. शासकीय आयटीआय महाविद्यालय ते श्री शिवाजी महाविद्यालय मार्गावर देखील परप्रांतीय ज्यूस विक्रेत्यांच्या गाड्या दिसून येतात. येथेही असाच प्रकार सर्रास आढळून येतो. शेगाव ते कठोरा नाका मार्गावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयानजीक दहा ते बारा गाड्या उभ्या असतात. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी फुटपाथ बांधले आहेत.
झाडांच्याआड आक्षेपार्ह वर्तन
अमरावती : याकरिता कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आलेत. मात्र, परप्रांतीय ज्यूस विक्रेते मात्र सगळे नियम धाब्यावर बसवून फुटपाथवर अतिक्रमण करीत आहेत. येथे वाढत असलेला प्रेमीयुगुलांचा वावर धोकादायक असतानाही त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे.
फुटपाथवर ज्यूस विक्रेत्यांच्या गाड्यांवर रात्रीच्या दरम्यान सर्रास प्रेमीयुगुलांचा वावर असतो. शेजारी झुडुपे वाढलेली असल्याने त्या आडोशाला मुला-मुलींचे गैरवर्तन सुरू असते. यावर अंकुश लावण्याची मागणी होत आहे.
परप्रांतीय ज्यूसविक्रेत्यांच्या ५० पेक्षा अधिक हातगाड्या
शहराच्या मुख्य मार्गावर परप्रांतीय ज्यूसविक्रेत्यांच्या ५० पेक्षा जास्त हातगाड्या आहेत. शहरात मागील काही वर्षांपासून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. महाविद्यालयीन तरूण-तरूणींच्या भरवशावरच हा व्यवसाय बहरला आहे. प्रेमीयुगुलांना जागा उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात हे विक्रेते त्यांच्याकडून ज्यूसचा जादा दर आकारतात. तसेच त्यांचे अश्लिल वर्तनही डोळ्यांआड केले जाते.
काय करतात पोलीस ?
सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन होत आहे. तरूण-तरूणी ज्यूच्या हातगाड्यांवर बिनधास्तपणे बसून अश्लिल हालचाली करतात. यामुळे इतर नागरिकांची कुचंबणा होते. अशा प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असते. परंतु पोलीस कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. त्यामुळे शहर पोलीस करतात तरी काय, हा प्रश्न सभ्य नागरिकांच्यावतीने उपस्थित केला जात आहे.