वडाळी बगिच्यात युगुलांचा ‘प्रेमालाप’
By Admin | Updated: December 13, 2015 00:21 IST2015-12-13T00:21:29+5:302015-12-13T00:21:29+5:30
निसर्गरम्य आणि हिरवागार वडाळी बगिचा तरूण प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान बनले आहे. भरदुपारी येथे झाडाझुडुपांत तर कुठे हिरव्यागार गालिचावर...

वडाळी बगिच्यात युगुलांचा ‘प्रेमालाप’
सीसीटीव्हीचा धाक नाही : नागरिकांची कुचंबणा, कारवाई केव्हा?
अमरावती : निसर्गरम्य आणि हिरवागार वडाळी बगिचा तरूण प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान बनले आहे. भरदुपारी येथे झाडाझुडुपांत तर कुठे हिरव्यागार गालिचावर हा ‘प्रेमालाप’ खुल्लमखुल्ला सुरू असतो. या परिसरातील सीसीटीव्हीसोबतच पोलिसांचाही हा ‘लव्हबर्डस’ना धाक उरलेला नाही, ‘फक्त कुटुंबासाठी प्रवेश’ अशी अट असताना प्रवेशाधिकार स्वत:कडे सुरक्षित ठेवलेल्या संबंधित एजंसीच्या नैतिकतेवरही या निमित्ताने प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
२५ एकरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेला वडाळी बगिचा ‘बीओटी’ तत्त्वावर यवतमाळ येथील राजहंस टुरिझमला चालविण्याकरिता देण्यात आला आहे. बगिच्याच्या एकंदरीत व्यवस्थापनाची जबाबदारी राजहंस टुरिझमकडे आहे. शहरातील निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून अमरावतीकरांचा ओढा वडाळी बगिच्याकडे वाढला आहे. येथे शहर व जिल्ह्यातून शैक्षणिक सहली सुद्धा येथे येतात.
कुटुंबाला प्रवेश असे येथील प्रवेशद्वारावर लिहिले आहे. मात्र सर्रासपणे प्रेमीयुगूल आणि महाविद्यालयीन तरूणांना सशुल्क प्रवेश दिला जातो. हे युगुल बगिच्यात फिरण्याऐवजी प्रेमालापावर भर देतात. त्यावेळी सर्वसामान्य कुटुंब आणि फिरण्यास आलेल्या नागरिकांची कुचंबना होते. इतर सुविधा उपलब्ध प्रेमीयुगूल मात्र निसर्गरम्य झुडुपात आणि आडोसा हेरून सार्वजनिक स्थळांचा गैरवापर करतात.
सार्वजनिक स्थळाचा गैरवापर
अमरावती : दिल्ली येथील निर्भया हत्याकांडानंतर अमरावतीमध्येही वडाळी, छत्रीतलाव, शिवटेकडी येथील प्रेमालापावर मोठा अंकुश लावण्यात पोलिसांना यश आले होते. त्यावेळी शहराबाहेर जाणाऱ्या मार्गांवरही तपासणी मोहिमेचे सत्र चालविण्यात आले. तथापि मध्यंतरीच्या काळात बरेच पाणी वाहून गेल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ बनली आहे. विशेष म्हणजे दीड-दोन वर्षांपूर्वी वडाळी बगिचा परिसरात महिला पोलिसांची ड्युटी लावण्यात आली होती. त्यावेळी अनेक प्रेमीयुगुलांवर प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा करण्यात आली. आज परिस्थिती ‘जैसे थे’ असून वडाळी बगिच्यात प्रेमीयुगुलांची गर्दी पाहायला मिळत आहे. या प्रेमीयुगुलांच्या ‘कर्तबगारी’मुळे अनेकदा महिला तथा ज्येष्ठांना मान खाली घालावी लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)