चार जागांवर कमळ फुलले

By Admin | Updated: October 19, 2014 23:12 IST2014-10-19T23:12:51+5:302014-10-19T23:12:51+5:30

नरेंद्र मोदींची लाट, काँग्रेसविरोधी अँटिइंकबन्सी ‘कॅश’ करण्यात भाजपला यश मिळाले आहे. गत विधानसभा निवडणुकीत खातेही न उघडणाऱ्या भाजपने अमरावती, दर्यापूर, मेळघाट व मोर्शी या चार जागा काबीज

The lotus blossom in four seats | चार जागांवर कमळ फुलले

चार जागांवर कमळ फुलले

अमरावती : नरेंद्र मोदींची लाट, काँग्रेसविरोधी अँटिइंकबन्सी ‘कॅश’ करण्यात भाजपला यश मिळाले आहे. गत विधानसभा निवडणुकीत खातेही न उघडणाऱ्या भाजपने अमरावती, दर्यापूर, मेळघाट व मोर्शी या चार जागा काबीज करुन ‘अच्छे दिन’ आल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादीला एकही जागा मिळविता आली नाही, हे विशेष.
१५ आॅक्टोबर रोजी मतदान आटोपताच कोण विजयी होणार, याविषयी तर्कवितर्क लावण्यात आले. मात्र, रविवारी मतमोजणी सुरु होताच पहिल्या फेरीपासून भाजपचे उमेदवार आघाडीवर होते. एकमात्र धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजपचे अरुण अडसड आणि काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत काट्याची लढत राहिली. अखेर जगताप यांचा ९७४ मतांनी निसटता विजय झाला. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर या विजयी झाल्यात. त्यांनी भाजपच्या निवेदिता चौधरी यांचा पराभव केला. प्रचारादरम्यान यशोमतींना विरोधकांनी लक्ष्य केले. मात्र, त्यांनी विकास कामांच्या भरवशावर दुसऱ्यांदा विजय खेचून आणला. मतदान आटोपताच काँग्रेसच्या एकमात्र यशोमती ठाकूर निवडून येतील, असा अंदाज बांधला गेला होता.
युती, आघाडी संपुष्टात आल्यानंतर सर्वच पक्षाचे उमेदवार रिंगणात होते. शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडल्यात. मात्र शिवसेनेला एकही जागा मिळविता आली नाही. याउलट भाजपने चार जागा काबीज करुन हिंदुत्ववादी विचारसरणीची मते एकवटण्यात यश मिळविले. मोर्शी व बडनेऱ्यात शिवसेनेच्या उमेदवारांनी शेवटपर्यंत झुंज दिली. परंतु दर्यापूर, मेळघाट, धामणगाव, तिवसा, अमरावती व अचलपुरात सेनेचे उमेदवार तिसऱ्या, चवथ्या क्रमांकावर राहिलेत. गत विधानसभा निवडणुकीत खाते न उघडणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळीही भोपळ्यावरच समाधान मानावे लागले. मागील निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. मात्र यावेळीही बच्चू कडू, रवी राणा हे दोन्ही अपक्ष उमेदवार पुन्हा विजयी झाले आहेत. मनसेचे तिवसा, धामणगाव, दर्यापूर, मोर्शी, अचलपुरात इंजिन धावले नाही. रिपाइं (गवई गट) ने दर्यापूर, तिवसा, अचलपूर व अमरावतीत उमेदवार उभे केले. मात्र एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. बसपने जिल्ह्यात आठही जागांवर उमेदवार उभे करुन खाते उघडण्याची धडपड चालविली परंतु अपयश आले. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी काँग्रेसला दोन जागांचे नुकसान झाले आहे. शिवसेनेकडे असलेली एक जागाही सांभाळता आली नाही.

Web Title: The lotus blossom in four seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.