वादळी पावसामुळे शेंदूरजनाघाटसह तालुक्यात संत्र्याचे लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST2021-09-08T04:17:36+5:302021-09-08T04:17:36+5:30
फोटो - वरूड ०७ पी वरूड : मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आलेल्या विजांच्या गडगडाटासह वादळी पावसामुळे शेंदूरजनाघाट परिसरात ...

वादळी पावसामुळे शेंदूरजनाघाटसह तालुक्यात संत्र्याचे लाखो रुपयांचे नुकसान
फोटो - वरूड ०७ पी
वरूड : मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आलेल्या विजांच्या गडगडाटासह वादळी पावसामुळे शेंदूरजनाघाट परिसरात मोठे नुकसान झाले. वादळी पावसाने संत्रा झाडे उखडली गेली, तर आंबिया बहराची फळे जमीनदोस्त झाली. यामुळे संत्रा उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाने तलाठी पाठवून पंचनामे सुरू केले आहेत.
तालुक्यात मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोळा भरण्याच्या वेळी अचानक वादळी पावसाळा सुरुवात झाली. विजांचा तुफान कडकडाट होऊन एक तास मुसळधार पाऊस झाला, तर त्यानंतर पहाटेपर्यंत रिमझिम पाऊस होता. यामध्ये शेंदूरजनाघाटलगत खेडी शिवारातील अरुण मोघे, नेपाल पाटील यांच्या शेतातील संत्रा झाडे उन्मळून पडली, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा आंबिया बहर गाळून जमीनदोस्त झाला. कपाशी, एरंडी, तूर, सोयाबीन, मिरची आदी पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुस्कान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वाठोडा, देऊतवाडा, गाडेगाव, हातुर्णा, पुसला, सावंगी, आमनेर, धनोडी, तिवसाघाट, टेम्भूरखेडा, सुरळी, बाभूळखेडा, राजुराबाजार, लोणी, जरूड, पेठ मांगरूळी, बेनोडा आदी परिसरात पावसामुळे नुकसान झाले आहे. आंबिया बहराला चांगलाच फटका बसला. महसूल प्रशासनाने पंचनामे करण्याकरिता पथक रवाना केले असल्याचे सांगण्यात आले आहे.