‘एक्सचेंज’ अर्जांची विक्री करून ग्राहकांची लूट
By Admin | Updated: November 17, 2016 00:04 IST2016-11-17T00:04:55+5:302016-11-17T00:04:55+5:30
पाचशे व हजारांच्या नोटा ‘एक्सचेंज’साठी आवश्यक अर्जांचीही दोेन रूपयांत विक्री केली जात असल्याचा प्रका....

‘एक्सचेंज’ अर्जांची विक्री करून ग्राहकांची लूट
आयडीबीआय शाखेतील प्रकार : एटीएममधून ५०० रूपयेच काढण्याची सक्ती
अमरावती : पाचशे व हजारांच्या नोटा ‘एक्सचेंज’साठी आवश्यक अर्जांचीही दोेन रूपयांत विक्री केली जात असल्याचा प्रकार बुधवारी शहरातील न्यू स्वस्तिकनगरातील आयडीबीआय बँकेच्या शाखेत उघडकीस आला.
पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही अवधीपर्यंत जुन्या नोटा बदलण्याची प्रक्रिया बँकांमध्ये सुरू आहे. नोटांच्या अदलाबदलीसाठी बँकांमार्फत एक अर्ज दिला जातोे. संबंधिताच्या कुठल्याही एका ओळखपत्राची झेरॉक्स प्रत देऊन संबधित बँक जुन्या नोटांच्या बदलात नव्या नोटा ग्राहकांना देते. मात्र, शहरातील न्यू स्वस्तिकनगरातील आयडीबीआय बँकेत नोटा बदलण्याकरिता गेलेल्या नागरिकांना मात्र, बँकेद्वारे अर्ज न देता नजीकच्याच एका व्यापारी प्रतिष्ठानात पाठवून तेथून अर्ज घ्यायला सांगितले जाते. ग्राहक त्याठिकाणी गेल्यानंतर तेथे त्यांना दोन रूपये देऊन अर्ज विकत घेण्यास सांगितले जाते. एटीएममधूनही केवळ पाचशे रुपयेच काढण्याची सक्ती बँकेने केली आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच गोची झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद केल्यापासून अमरावतीकरांची प्रचंड ताराबंळ उडाली आहे. मागील पाच दिवसांपासून शहरात केवळ नोटांचीच चर्चा सुरु आहे. नोटा बदलविण्यासाठी बँकांच्या रांगेत उभे राहणे, एटीएममध्ये पैसे नसणे, आदी समस्यांमध्ये ग्राहक अडकले आहेत. दैनंदिन गरजांसाठी लागणारा पैसा मिळावा, या उद्देशाने बहुंताश नागरिक बँका व एटीएममध्ये जात आहेत. मात्र, बँकामधील रांगा व एटीएममध्ये निर्माण झालेल्या पैशांच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आवश्यक तेवढे पैसे मिळत नसल्यामुळे नागरिकांची बरीचशी कामे अडकून पडली आहेत.
शिलांगण मार्गावरील आयडबीआय बँकेत हे चित्र दिसून आले. नागरिकांना पाचशे व हजारांच्या नोटा बदलून दिल्या जात आहेत. मात्र, त्यासाठी ग्राहकांना इतर बँकांमध्ये मोफत मिळणारा अर्ज देखील या बँकेत उपलब्ध नव्हता. तो शेजारच्या एका व्यापारी प्रतिष्ठानामार्फत दोन रूपयांना विकत घ्यावा लागत होता. आधीच चिल्लरचा तुटवडा असताना अर्ज घ्यावा तरी कसा, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. त्यातच आयडीबीआयच्या एटीएममधून केवळ पाचशे रुपये काढण्यास परवानगी दिली जात आहे. एटीएममधून एकावेळी दोन हजार रुपये काढण्यास शासनाने परवानगी दिली असताना आयडीबीआयच्या एटीएमवर केवळ पाचशे रुपये काढण्यास सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे शासनाने ठरवून दिलेली रोख सुध्दा नागरिकांना मिळत नाही.
बँकांनी नोटा एक्सचेंज करण्यासाठी अर्जाची झेरॉक्स नागरिकांना दिली तर चालेल. मात्र, त्या अर्जाची विक्री होत असेल तर संबंधित शाखेला सूचना देण्यात येईल.
- सुनील रामटेके,
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.
संबंधित शाखेला अर्जपुरवठा करण्यात आला आहे. मात्र, संबंधित शाखेतून अर्ज घेण्यास नागरिकांना दुसरीकडे पाठविले जात असेल तर हा प्रकार थांबविण्याच्या सूचना देण्यात येतील.
- प्रदीप गायकवाड,
व्यवस्थापक, आयडीबीआय