वीज गळतीच्या नावाखाली ग्राहकांची लूट

By Admin | Updated: July 23, 2016 00:40 IST2016-07-23T00:40:29+5:302016-07-23T00:40:29+5:30

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला वीज ग्राहक त्रासले आहेत. वीज गळतीच्या नावावर ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे.

Looting of customers in the name of power leak | वीज गळतीच्या नावाखाली ग्राहकांची लूट

वीज गळतीच्या नावाखाली ग्राहकांची लूट

महावितरणचे दुर्लक्ष : वीज चोरीचा भुर्दंड सामान्य ग्राहकांच्या माथी
सुनील देशपांडे अचलपूर
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला वीज ग्राहक त्रासले आहेत. वीज गळतीच्या नावावर ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे. प्रामाणिक ग्राहकांना त्याची झळ मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे जनतेचे म्हणणे आहे.
वितरण कंपनीच्या काही अधिकाऱ्यांमुळे अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यातील बहुतांशी गावात वीज चोरी होत असते. ज्या ज्या वेळी भरारी पथकाने वीज चोरांविरुद्ध मोहीम राबविली, त्यावेळी वीज चोरांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात आली असल्यामुळे ही वीज चोरी काही स्थानिक कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय होऊ शकत नाही हे स्पष्ट आहे. वीज चोरी हे वीज गळतीचे मुख्य कारण असल्याचे कंपनीचे काही अधिकारी ग्राहक वर्गास सांगत असतात.
प्राप्त होणाऱ्या एकूण विजेपैकी १५ टक्के वीज गळती (टॉलरन्स) मान्य करण्यात आली आहे. १५ टक्केपर्यंत वीज गळती असल्यास त्याचा अधिभार ग्राहकांवर लावता येत नाही. परंतु सद्यस्थितीत गळतीचे प्रमाण ३० ते ४० टक्के असून गळतीची रक्कम नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांकडून पठाणी पद्धतीने वसूल केले जात आहे.
अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यातील काही ग्राहकांकडे अजूनही जुने मीटर आहेत, तर काही ग्राहकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अ‍ॅटजेस्टमेंट केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार काही ग्राहकांना विजेचे मीटर दिलेले असून त्यांचा नियमित वापर सुरू असला तरी तो रेकॉर्डवर नाही. अशा ग्राहकांचा भुर्दंड नियमित देयके भरणाऱ्या ग्राहकांकडून कंपनी वसूल करीत आहेत. कालांतराने रेकॉर्डवर आल्यानंतर त्या वीज ग्राहकांकडून सुद्धा वीज गळतीपोटी वीज वापरापोटीची रक्कम दंडासह वसूल केल्या जाते. एकाच कारणासाठी तब्बल दोनदा वीज वितरण कंपनी पैसे वसूल करीत आहे. या सर्व बाबी संतापजनक असून ग्राहकांची खुलेआम लूट असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.

आयोगाच्या सुनावणीत मुद्दा चर्चेला
वीज गळतीच्या नावावर वितरण कंपनी ग्राहकांच्या लुटीचा मुद्दा २०१२ पासून लावून धरला आहे. तेव्हा कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदन दिले होते. कारवाई न झाल्याने आंदोलनही केले होते. मागील वर्षी महावितरण वीज नियामक आयोगाकडे लेखी तक्रार देऊन सुनावणीमध्ये माहितीही दिली होती. दि. ११-७-२०१६ रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोगाच्या सुनावणीत हा मुद्दा जोरकसपणे मांडला होता. वीज चोरी हे अधिभार हेच मुख्य कारण आहे, असे रयत संघटनेचे अध्यक्ष राहूल कडू यांनी सांगितले.

जुळ्या शहरासह तालुक्यात कित्येक ठिकाणी तारावर आकोडे टाकून वीज चोरी केली जाते. अधिभाराच्या नावाखाली शेतकऱ्याला त्याचा आर्थिक भुर्दंड बसतो. काही शेतातील विहिरीत पाणी नसल्याने ५ ते ६ वर्षांपासून बंद आहे. त्यांना अजूनही बिले येतात. शेवटी शेतकरीच नागवला जातो. इंधन समायोजन आकार हाही एकप्रकारचा अधिभारच आहे.
- सोमेश ठाकरे (अध्यक्ष)

मागच्या आठवड्यात चार ठिकाणी वीज चोरी होत असल्याची माहिती मिळाली. आमचे पथक गेले पण एकाच ठिकाणची वीज चोरी सापडली. सद्या वीज गळतीचा अधिभार लावला जात नाही. अचलपूर तालुक्यात वीज चोरीचे प्रमाण नसल्यासारखे आहे.
- जे. एच. वाघमारे,
उपकार्यकारी अभियंता

 

Web Title: Looting of customers in the name of power leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.