सिलिंडर वितरण कंपन्यांकडून शहरातील ग्राहकांची लूट
By Admin | Updated: July 2, 2015 00:15 IST2015-07-02T00:15:12+5:302015-07-02T00:15:12+5:30
गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपनीमार्फत निर्धारित दरांपेक्षा प्रत्येक ग्राहकाकडून २० रूपये अतिरिक्त रक्कम ...

सिलिंडर वितरण कंपन्यांकडून शहरातील ग्राहकांची लूट
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : फरकाची रक्कम सव्याज परत करा
अमरावती : गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कंपनीमार्फत निर्धारित दरांपेक्षा प्रत्येक ग्राहकाकडून २० रूपये अतिरिक्त रक्कम आकारून लुबाडणूक केली जात असल्याची तक्रार मंगळवारी भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. आतापर्यंत शहरातील ग्राहकांकडून आकारलेली १ कोटी ४० लाख रूपयांची ही अतिरिक्त रक्कम कंपनीने ग्राहकांना व्याजासह परत करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शहरामध्ये अनुदानीत आणि विना अनुदानीत सिलिंडरच्या किमतीमध्ये तफावत असल्याची बाब २२ आॅक्टोबर रोजी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, यावर काहीही कारवाई झाली नाही. परंतु अमरावती व नागपूर येथील सात वर्षांचा याबाबतचा तुलनात्मक अभ्यास केला असता विना अनुदानीत सिलिंडरवर शहरातील ग्राहकांकडून प्रती सिलिंडर २० रूपये जास्त रक्कम आकारण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. गॅस कंपनीकडून सिलिंडरचा पुरवठा करताना सप्लाय डेपो ते वितरक हे अंतर चुकीचे गृहीत धरले जात असल्याचा आरोप देखील भारतीय यांनी केला आहे.
अंजनगांव, अचलपूर, अमरावती, चांदूररेल्वे, येवदा आदी ठिकाणी धनज डेपोवरून सिलिंडरचा पुरवठा केला जातो. त्याठिकाणी कुठलाही टोल नाका अस्तित्वात नाही. मात्र, कंपनीकडून ग्राहकांकडून प्रती सिलिंडर ०.२५ ते ०.५० पैसे टोल आकारण्यात येतो. शहरात २६ नोव्हेंबर २०१२ ते ३१ मे २०१५ पर्यंत सात लाख विनाअनुदानीत सिलिंडर तीनही कंपन्यांतर्फे वितरित करण्यात आले. यात प्रती सिलिंडर २० रूपये दराने आकारणी करून अमरावतीकरांची सुमारे १ कोटी ४० लाख रूपयांनी लूट करण्यात आली असल्याचे भारतीय यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
धनज डेपो अस्तित्वात आल्यापासून अंतराच्या फरकाची अद्यापपर्यंत कोटयवधी रूपयांची लूट कंपनीने केली आहे. त्यामुळे हा प्रकार त्वरीत बंद करून कंपनीने ग्राहकांकडून घेतलेले अतिरिक्त पैसे व्याजासह परत करण्याचे आदेश देण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तुषार भारतीय यांनी प्रशासनाला दिला आहे. यामुळे सिलिंडर ग्राहकांची होणारी लूट थांबणार आहे.