देवीचा अवतार सांगून लुबाडले
By Admin | Updated: March 17, 2016 00:34 IST2016-03-17T00:34:40+5:302016-03-17T00:34:40+5:30
घरात लहान मुलासह एकटी असल्याचे पाहुन एका अनोळखी महिलेने देवाचा प्रकोप होण्याची भिती दाखवून घरात प्रवेश केला.

देवीचा अवतार सांगून लुबाडले
वरठी येथील प्रकरण : सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास
वरठी : घरात लहान मुलासह एकटी असल्याचे पाहुन एका अनोळखी महिलेने देवाचा प्रकोप होण्याची भिती दाखवून घरात प्रवेश केला. मी सांगितल्याप्रमाणे न केल्यास कुंटुबातील सदस्य मरतील, असे सांगून पुजा करण्यासाठी अंगावरचे दागिने व रोख रक्कम असे २० हजार ७०० रुपयांच्या सामानावर हात साफ केल्याचा प्रकार वरठी रेल्वे वसाहतीत उघडकीस आला.
मंगळवारला घटनेच्या दिवशी दुपारी १२.३० वाजता दरम्यान राजेशकुमारी मिना (२८) हे १० वर्षीय मुलासोबत घरी होत्या. त्यावेळी पांढरे कपडे धारण करून कपाळावर लाल टीळा लावून एक अनोळखी महिला घरासमोर आली. आपण दगड फोडून माताजीचे अवतार असल्याचे सांगून महिलेच्या मनात धास्ती भरवली. माताजीने तुमच्या घरी पाठवले असून मला पुजा करायची आहे असे सांगितले. मी म्हणतो तसे केले नाही तर तुमचा मुलगा, पतीचा मृत्यू होईल. देवीचा प्रकोप होऊन तुमचे कुंटुब उध्वस्त होईल, असे सांगितले.
श्रद्धेमुळे सदर महिलेने पुजा करण्यासाठी तयारी दर्शविली. त्यानुसार त्या अनोळखी महिलेने तांब्याच्या लोट्यात पाणी आणि घरातून पीठ आणायला सांगितले. सदर पीठात पुजा करण्यासाठी अंगावरचे दागिने मागितले. त्यावेळी राजेशकुमारीने विचार न करता कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने व पायातील पायपट्या आणि ७०० रुपये तिच्या स्वाधीन केले. सर्व सामान व पैसे प्लास्टिकच्या पिशवीत टाकून ते पीठात मिसळवून ठेवल्याचे भासवून सदर महिला साहित्य व पैसे घेऊन पसार झाली. दरम्यान दागिने सुरक्षित पीठात आहेत.
संध्याकाळी ७ वाजता दोन अगरबत्ती लावून पीठातून दागिणे काढून घेण्यासाठी सागितले होते. त्यावेळी १०० रुपयांची नोट पण मिळणार आणि त्या पैशाचे प्रसाद गावात वाटल्याने सर्व संकटे दूर होणार असल्याचे सांगून सदर महिला पसार झाली. देवीचा अवतार घरी आल्याच्या श्रद्धेत त्या महिलेने कोणतीही चौकशी न करता तिचे एैकले. एवढेच नाही तर त्या महिलेला सोडण्यासाठी बसस्थानकापर्यत गेली. देवीचा अवतार म्हणून मिळालेल्या आदेशानुसार रात्री ७.०० वाजता सदर महिलेने दोन अगरबत्ती लावून घरात ठेवलेल्या पीठातून दागिणे शोधले. परंतु दागिणे काही मिळाले नाही.
अनोळखी महिलेकडून लुबाडल्याचे समजताच तिने पोलीसात धाव घेतली. राजेशकुमारी मिना यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ४२० कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद कदम करीत आहेत. (वार्ताहर)