Lok Sabha Election 2019; अजब-गजब! ती माझी बायको नव्हेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:09 IST2019-03-30T13:08:05+5:302019-03-30T13:09:47+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती शहरातील एका महिलेने भरलेल्या उमेदवारी अर्जामुळे अजब-गजब प्रकार पुढे आला आहे.

Lok Sabha Election 2019; अजब-गजब! ती माझी बायको नव्हेच!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी एका महिलेने भरलेल्या उमेदवारी अर्जामुळे अजब-गजब प्रकार पुढे आला आहे. त्या महिलेने मीनाक्षी सोमेश्वर करवाडे नावाचे मतदार कार्ड वापरले. तथापि, सोमेश्वर रामकृष्ण करवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे ‘ती माझी पत्नी नव्हे’ असा आक्षेप तक्रारीतून नोंदविला आहे.
तक्रारकर्ते सोमेश्वर रामकृष्ण करवाडे हे अमरावती शहरातील वडाळी येथे राहतात. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव अमरावती लोकसभा मतदारसंघातून मीनाक्षी सोमेश्वर करवाडे नामक महिलेने उमेदवारी अर्ज भरला. त्या अर्जावर पती म्हणून सोमेश्वर करवाडे यांचे नाव आहे. मात्र, ती माझी बायको नाही. माझा तिच्याशी कोणताही संबंध नाही. तिने दाखल केलेल्या अर्जात बनावट दस्तावेजांचा वापर करून माझ्या नावाचा दुरुपयोग केला आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार सोमेश्वर करवाडे यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.२६ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना केली आहे. यासंबंधाने त्यांनी त्यांचे अधिकृत इलेक्शन कार्ड व कुटुंबातील सदस्यांची नावे असलेले रेशन कार्डची प्रत तक्रारीसोबत जोडलेली आहे. सोमेश्वर करवाडे यांच्या तक्रारीवर निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाव कमी करण्यासाठी तहसीलदारांना पत्र
तीन वर्षांपूर्वी सोमेश्वर करवाडे यांनी मीनाक्षी सोमेश्वर करवाडे यांच्या नावातील सोमेश्वर नाव कमी करण्यासंबंधी पत्र तहसीलदारांना पत्र दिले होते. आता तिने पती म्हणून आपले नाव वापरून इलेक्शन कार्ड बनविल्याचे सोमेश्वर करवाडे यांच्या निदर्शनास आले.
महिलेचे नाव मीनाक्षी भीमराव निरगुळे?
सोमेश्वर करवाडे यांच्या तक्रारीनुसार, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या महिलेचे नाव मीनाक्षी भीमराव निरगुळे आहे. हे खात्रीपूर्वक माहिती असल्याचे सोमेश्वर करवाडे तक्रारीत म्हणत आहे. भीमराव निरगुळेंशी त्या महिलेची फारकत झालेली नाही. तिने माझ्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिसांत खोट्या तक्रारी केल्या होत्या. परंतु, प्रकरण अंगलट येईल, असे लक्षात येताच तक्रारी परत घेतल्याचे सोमेश्वर करवाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सोमेश्वर करवाडे यांच्या तक्रारीचे आम्ही समर्पक उत्तर देऊ. सदर महिलेने शपथपत्र लिहून दिले आहे. संबंधित व्यक्तीने न्यायालयात दाद मागावी.
- शरद पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी