लोकअदालत: कौटुंबिक न्यायालयाने मिटविले नऊ कौटुंबिक वाद; समुपदेशनावर भर

By प्रदीप भाकरे | Updated: December 10, 2023 14:26 IST2023-12-10T14:25:49+5:302023-12-10T14:26:00+5:30

लोक अदालतीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील यांनी भेट दिली.

Lok Adalat: Family Court settled nine family disputes; Emphasis on counselling | लोकअदालत: कौटुंबिक न्यायालयाने मिटविले नऊ कौटुंबिक वाद; समुपदेशनावर भर

लोकअदालत: कौटुंबिक न्यायालयाने मिटविले नऊ कौटुंबिक वाद; समुपदेशनावर भर

अमरावती: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आर. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली होती. यात ३३ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली. पैकी नऊ प्रकरणे निकाली काढण्यात यश आले.

‘भांडणापेक्षा समझौता बरा, कौटुंबिक सौख्यातच आनंद खरा’असा संदेश देवून निकाली निघालेल्या नऊ प्रकरणांपैकी दोन प्रकरणांत संबंधित पक्षकारांचा संसार पुन्हा जुळविण्यात आला. कौटुंबिक न्यायालयाच्या पुढाकाराने घटस्फोट टाळून त्यांनी एकत्र संसार करण्याचा निर्णय घेतला. सात प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड करण्यात आली. लोकअदालतीमध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी ए. व्ही. कस्तुरे यांनी पॅनल जज म्हणून, तर ॲड. रुचिता तुळजापुरे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले.

लोक अदालतीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील यांनी भेट दिली. कौटुंबिक न्यायालयातील ही लोक अदालत यशस्वी होण्यासाठी न्यायाधीश आर. आर. पोंदकुले यांच्या मार्गदर्शनात प्रभारी प्रबंधक प्रदीप चोरे, न्यायालयीन व्यवस्थापक धनंजय क्षिरसागर, लिपीक अलका चोबे व स्नेहा इंगोले, एस. आर. बाकडे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Lok Adalat: Family Court settled nine family disputes; Emphasis on counselling