प्राथमिक आरोग्य केंद्राला आदिवासींनी ठोकले कुलूप
By Admin | Updated: August 10, 2015 00:01 IST2015-08-10T00:01:16+5:302015-08-10T00:01:16+5:30
मागील १५ दिवसांपासून एकमात्र महिला शिपाईच्या भरवशावर सुरू असलेल्या चाकर्दा येथील प्राथमिक उपकेंद्राला संतप्त गावकऱ्यांनी रविवारी सकाळी ९ वाजता कुलूप ठोकले.

प्राथमिक आरोग्य केंद्राला आदिवासींनी ठोकले कुलूप
रुग्ण वाऱ्यावर : महिला शिपाईच्या हस्ते औषधी वाटप
धारणी : मागील १५ दिवसांपासून एकमात्र महिला शिपाईच्या भरवशावर सुरू असलेल्या चाकर्दा येथील प्राथमिक उपकेंद्राला संतप्त गावकऱ्यांनी रविवारी सकाळी ९ वाजता कुलूप ठोकले. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आंदोलनात सरपंच, उपसरपंच, सदस्य व पोलीस पाटलांचा सहभाग असल्याने आरोग्य प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या चाकर्दा उपकेंद्र हे धारणीपासून १५ किमी अंतरावर आहे. येथे एक आरोग्य अधिकारी, २ परिचारिका आणि एक महिला शिपाई कार्यरत आहे. परंतु १५ दिवसांपासून केवळ महिला शिपायाच्या भरवशावर हे उपकेंद्र सुरू आहे. त्याचप्रमाणे येथे स्वतंत्र परिचारिकेचेही मुख्यालय असून यात प्रसूतीगृहाची इमारत बांधण्यात आली आहे. मात्र मुख्य आरोग्य कर्मचारी डॉक्टरांसह बेपत्ता असल्याने गावातील रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे.
शनिवारी रात्री १२ वाजता गावातीलच शीला रमेश पोर्तेकर यांना प्रसव वेदना सुरू झाल्या. तिला प्रा. आ. उपकेंद्रात नेले. परंतु तेथेही डॉक्टर व कर्मचारी नसल्याने परत घरी आणले गेले. मदतीशिवाय तिचे बाळंतपण करण्यात आले. रविवारी पहाटे ही वार्ता कळताच गावकऱ्यांनी सरपंच सुंदरबाई ढिमरेकर, उपसरपंच, राम बेठेकर, नानकराम ढिमरेकर, परसराम बेठेकर, अशोक भालेराव आदींनी या उपकेंद्राला कुलूप ठोकले.