अडसडांच्या राजकीय पुनर्वसनासाठी ‘लॉबिंग’

By Admin | Updated: October 26, 2014 22:34 IST2014-10-26T22:34:19+5:302014-10-26T22:34:19+5:30

जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांचा धामणगाव रेल्वे मतदारसंघातून निसटता पराभव झाला. अडसड हे भाजपचे जुने जाणते नेते असल्यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी समर्थक

'Lobbying' for the political rehabilitation of the buses | अडसडांच्या राजकीय पुनर्वसनासाठी ‘लॉबिंग’

अडसडांच्या राजकीय पुनर्वसनासाठी ‘लॉबिंग’

अमरावती : जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांचा धामणगाव रेल्वे मतदारसंघातून निसटता पराभव झाला. अडसड हे भाजपचे जुने जाणते नेते असल्यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी समर्थक सरसावले आहेत. शनिवारी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची तर अमरावतीत रविवारी केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन अडसड यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व बहाल करुन राज्य मंत्रिमंडळात सहभागी करण्यासाठी जोरदार ‘लॉबींग’ चालविली आहे.
ना. गडकरी हे पत्नी, मुलगा, सून व नातवासह येथील श्रीकृष्णपेठ स्थित त्यांचे मामा गजानन रहाटगावकर (पांडे) यांच्याकडे कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आले असता अरुण अडसड समर्थकांनी त्यांची भेट घेतली. नितीन गडकरी वाहनातून उतरताच त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मोठ्या संख्येने आलेल्या अडसड समर्थकांना ‘कसे काय? बरे आहे’ अशी विचारणा करीत त्यांची कैफियत जाणून घेतली. जिल्हा परिषदेचे माजी सभापती रामदास निस्ताने, भाजप तालुकाध्यक्ष विठ्ठलराव राळेकर, बबनराव गावंडे, अनिल राठी आदींनी गडकरींपुढे भूमिका मांडताना अडसडांना आमदारकी, मंत्रीपद देणे का गरजेचे आहे? हे पटवून सांगितले. अरुण अडसडांचा निसटता पराभव हा सर्वच कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र धामणगाव रेल्वे मतदारसंघात भाजप जिंवत ठेवायची असेल तर अडसडांचे राजकीय पुनर्वसन करणे गरजेचे आहे, हे निक्षूण सांगण्यात आले. काँग्रेसचे आमदार हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. भाजप कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मिळावा, यासाठी अडसडांना राज्यमंत्री मंडळात सामावून घेणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांपासून भाजप कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यात अडसड यांची मोलाची भूमिका राहिली. अनेकांनी पक्ष बदलले, मात्र अडसड हे भाजपात आजही कायम आहेत. अख्ख्ये आयुष्य राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजपला वाहणाऱ्या अडसडांना न्याय मिळाला पाहिजे, ही मागणी गडकरी यांच्या पुढ्यात ठेवण्यात आली. यावेळी गडकरींनी मी केंद्रात आहे. यासंदर्भात काय करता येईल, वरिष्ठांशी चर्चा करु, असे भेटावयास आलेल्या अडसड समर्थकांना त्यांनी सांगितले. ‘नक्कीच अरुणभाऊंना न्याय देऊ’ हेदेखील सांगावयास गडकरी विसरले नाहीत.
यावेळी रामदास निस्ताने, विठ्ठलराव राळेकर, बबनराव गांवडे, अनिल राठी, साहेबराव गांवडे, हरिदास राऊत, कृष्णा मारोटकर, हेमनकरण कांकरीया, मोहन इंगळे, संजय मुंदडा, अनिल तिजारे, गोविंद तिजारे, राजेश्वर निस्ताणे, वासुदेव मानकानी,धीरेंद्र खेरडे, खंडाळकर पाटील, राजेश पाठक, वसंतराव सावंत, सुरेश गायधने, मनोहर टाले, मनोहर सुने आदींनी अडसडांच्या राजकीय पुनर्वसनाची बाजू मांडली.
दरम्यान सुनील देशमुख, प्रकाश भारसाकळे, प्रवीण पोटे, रमेश बुदिंले, प्रभुदास भिलावेकर, अनिल बोंडे या आमदारांसह शिवराय कुळकर्णी, रवींद्र खांडेकर, किरण पातुरकर, निवेदिता चौधरी, प्रदीप शिंगोरे, तुषार भारतीय, दिनेश सूर्यवंशी, विजय मोहता, सदाभाऊ पुंशी, संजय अग्रवाल आदी भाजप पदाधिकाऱ्यांनी नितीन गडकरींची भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.

Web Title: 'Lobbying' for the political rehabilitation of the buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.