महापालिकेत स्थायी समितीत ‘एन्ट्री’साठी लॉबिंग

By Admin | Updated: January 3, 2015 00:22 IST2015-01-03T00:22:56+5:302015-01-03T00:22:56+5:30

महापालिकेत मलईदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीमधून मार्च महिन्यात आठ सदस्यांना बाहेर पडावे लागणार आहे.

Lobbying for 'entry' in standing committee in municipal corporation | महापालिकेत स्थायी समितीत ‘एन्ट्री’साठी लॉबिंग

महापालिकेत स्थायी समितीत ‘एन्ट्री’साठी लॉबिंग

अमरावती : महापालिकेत मलईदार समिती म्हणून नावारुपास आलेल्या स्थायी समितीमधून मार्च महिन्यात आठ सदस्यांना बाहेर पडावे लागणार आहे. मात्र नव्या आठ सदस्यांची निवड प्रक्रिया ही फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत करावी लागत असल्याने अनेक इच्छुकांनी आतापासून स्थायी समितीत ‘एन्ट्री’ साठी नेत्यांकडे लॉबिंग सुरु केले आहे. त्यामुळे स्थायी समितीत कोणाची लॉटरी लागेल, हे फेबु्रवारीत कळेल.
महापालिकेची तिजोरी असलेल्या स्थायी समितीत वर्णी लागली की, आर्थिक बाजू भक्कम होते, हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे नगरसेवकांची या समितीत जाण्याची चढाओढ राहते. दर आठवड्यात स्थायी समितीची बैठक होऊन प्रशासनाला विकास कामे अथवा खर्चाबाबतच्या प्रकरणांना मंजुरी देण्याचे काम ही समिती करते. स्थायी समितीचा कारभार एकुणच आर्थिकतेच्या विषयी चालत असल्याने अनेक सदस्यांना दुसऱ्या समितीत जाण्याऐवजी याच समितीत प्रवेशासाठी धडपड सुरु राहते. एकदा स्थायी समितीत गेले की, दोन वर्षांची चिंता मिटते.
त्यामुळेच बहुतांश नगरसेवक स्थायी समितीला प्राधान्य देतात. अशातच स्थायी समितीचे सभापतीपद मिळाले तर सोन्याहून पिवळे अशी प्रतिक्रिया असते. नवीन आठ सदस्यांची निवड प्रक्रिया फेब्रुवारीत होणार असली तरी महापालिकेत नेत्यांना नगरसेवकांनी स्थायी समितीत ‘एन्ट्री’ साठी तगादा लावला आहे. आठ सदस्यांमध्ये काँग्रेसचे तीन सदस्य स्थायी समितीत जाणार आहे. त्यानंतर राकाँचे दोन तर शिवसेना, रिपाइं- जनविकास काँग्रेस, बसपा, भाजपाच्या प्रत्येकी एका सदस्यांची वर्णी लागणार आहे.
विजयासाठी हवेत नऊ सदस्य
फेबु्रवारीत सदस्य निवडीची प्रक्रिया आटोपताच मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक होईल. १६ सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीत सभापतीपदाच्या निवडणुकीत विजयासाठी ९ सदस्य संख्या आवश्यक आहे. त्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ पुरेसे असून येत्या सभापती पदावर काँग्रेसचा दावा आहे.
स्थायी समितीत नव्याने आठ सदस्यांनी निवड होणार आहे. मात्र स्थायीत प्रवेशासाठी लांबलचक यादी असली तरी ज्या नगरसेवकांना काहीच लाभ मिळाला नाही, अशांना फेब्रुवारीत न्याय मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये आसीफ तव्वकल, प्रदीप हिवसे, अरुण जयस्वाल, सुनीता भेले, राष्ट्रवादीतून प्रवीण मेश्राम, विजय बाभुळकर, जयश्री मोरय्या, रिपाइं-जनविकास काँग्रेसमधून राजू मसराम, सुजाता झाडे, भाजपतून तुषार भारतीय, चंदुमल बिल्दानी यांची नावे आघाडीवर आहेत.

Web Title: Lobbying for 'entry' in standing committee in municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.