स्थायी समितीत नियुक्तीसाठी ‘लॉबिंग’
By Admin | Updated: January 24, 2015 22:45 IST2015-01-24T22:45:37+5:302015-01-24T22:45:37+5:30
महापालिकेत ‘मलईदार’ समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीत नियुक्तीसाठी अनेक नगरसेवकांनी नेत्यांकडे ‘लॉबिंग’ सुरु केले आहे. स्थायी समितीची सदस्य संख्या १६ असून

स्थायी समितीत नियुक्तीसाठी ‘लॉबिंग’
अमरावती : महापालिकेत ‘मलईदार’ समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीत नियुक्तीसाठी अनेक नगरसेवकांनी नेत्यांकडे ‘लॉबिंग’ सुरु केले आहे. स्थायी समितीची सदस्य संख्या १६ असून यात आठ सदस्य नैसर्गिक प्रक्रियेनुसार बाहेर पडतील. नव्या आठ सदस्यांची नियुक्ती फेब्रुवारीत होणाऱ्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे.
सध्या स्थायी समितीचे सभापती मिलिंद बांबल हे आहेत. मात्र, मार्च महिन्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची निवडणूक ही संख्याबळानुसार काँग्रेसच्या ताब्यात राहिल, अशी राजकीय परिस्थिती आहे. स्थायी समिती सभापतीपदाला मुंबई महापालिका अधिनियमानुसार आर्थिक विषयांचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे या समितीत प्रवेश मिळाला की, सदस्यांचे ‘प्रश्न’ दूर होतात, असा आजतागायतचा अनुभव आहे. फेब्रुवारीत स्थायी समितीत सदस्य म्हणून प्रवेश मिळाला की पुढची दोन वर्षे चिंता नाही, याअनुषंगाने काही नगरसेवकांनी रणनिती आखली आहे. ज्या सदयांना आतापर्यंत स्थायी मध्ये प्रवेश मिळाला नाही, अशा सदस्यांची फेब्रुवारीत नक्कीच लॉटरी लागेल, अशी विश्वसनीय माहिती आहे. स्थायी समितीत येणारे बहुतांश विषय अर्थकारणाशी निगडीत असल्याने नगरसेवकांनी नेत्यांकडे आपली नावे स्थायीत कशी जातील, याचे नियोजन चालविले आहे. तर दुसरीकडे स्थायीत नियुक्तीसाठी सदस्यांची लांबलचक यादी असल्याने कोणाची वर्णी लावावी, हा खरा प्रश्न गटनेत्यांसमोर उपस्थित होणार आहे. अशातच बसपा, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात नेतेपदावरुन काही महिन्यांपासून वाद सुरु आहे. विभागीय आयुक्त, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा गटनेतेपदाचा वाद कायम असल्याने स्थायी समितीत सदस्य नियुक्तीच्यावेळी वादंग उठण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सध्याच्या स्थायी समितीमधून काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादीचे दोन तर भाजप, शिवसेना, जनविकास-रिपाइं चे प्रत्येकी एक सदस्य बाहेर पडणार आहे. फेब्रुवारीच्या अखेर किंवा मार्च महिन्याच्या प्रारंभी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक होईल. माजी आ. रावसाहेब शेखावत व संजय खोडके यांच्या वर्चस्वात असलेल्या सदस्यांच्या बळावर महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी पार पडलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत संजय खोडके गटाने चरणजितकौर नंदा यांना महापौरपद बहाल करताना रावसाहेब शेखावत गटाला येत्या स्थायी समितीचे सभापतीपद देण्याचा करार झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शेखावत आणि खोडके गटाच्या संख्याबळाच्या आधारावर सभापतीपद काँग्रेसला सहज मिळेल, असे चित्र आहे. मात्र, सभापती पदाऐवजी सदस्य मिळविण्यासाठी सुद्धा मोर्चेबांधणी सुरु आहे. (प्रतिनिधी)