जिवंत साप घरात सोडून पैसे उकळण्याचा धंदा
By Admin | Updated: April 20, 2015 00:26 IST2015-04-20T00:26:21+5:302015-04-20T00:26:21+5:30
जिवंत सापांना लोकांच्या घरात, दुकानात सोडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे व पैसे उकळण्याचा गोरखधंदा मागील १५ दिवसांपासून परिसरात सुरु आहे.

जिवंत साप घरात सोडून पैसे उकळण्याचा धंदा
दोघांवर कारवाई : नागरिकांमध्ये भीतीचे वातारण, वनविभागाने घेतली दखल
रोहित प्रसाद तिवारी मोर्शी
जिवंत सापांना लोकांच्या घरात, दुकानात सोडून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे व पैसे उकळण्याचा गोरखधंदा मागील १५ दिवसांपासून परिसरात सुरु आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी असा खेळ करणाऱ्या दोघांवर रविवारी कारवाई केली आहे.
बाहेरगावची काही मंडळी जिवंत साप टोपलीत ठेवून लोकांच्या घरी, दुकानात पोहोचत असत. टोपलीतील साप हातात धरुन ते लोकांकडून पैशाची, अन्नधान्याची मागणी करीत होते. त्यांना पैसे, अन्नधान्य दिले नाही तर ते साप दुकानात, घरात सोडून देत असत. या प्रकारामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भीतीपोटी नागरिकांनी संबंधितांना पैसे व धान्य देण्याचा प्रकार येथे वाढला आहे. त्यामुळे या लोकांचा धंदा जोरात सुरु होता. काही जागरुक नागरिकांनी सर्पमित्रांना, पोलिसांना बोलाविण्याची धमकी दिल्यावर ही मंडळी तेथून पोबारा करीत असत; तथापि त्यांचा हा भीतीयुक्त धंदा सुरुच होता. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये, दुकानदारांमध्ये दहशत निर्माण झाली होती.
शनिवार १८ एप्रिल रोजी अशाचप्रकारे ही मंडळी जयस्तंभ चौकात दहशत निर्माण करुन धंदा करीत असताना एका नागरिकाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करुन हा प्रकार बंद पाडण्याची विनंती केली.
मोर्शीचे वर्तुळ अधिकारी राजेंद्र राऊत, विशेष वर्तुळ अधिकारी अमोल चौधरी, वनरक्षक एस. व्ही. डहाके आणि वनमजूर मनोहर वणवे यांनी दूरभाष केंद्र परिसरात दोघांना त्यांच्याकडे असलेल्या साप, आणि टोपलीसह पकडले; तथापि वन कार्यालयात या आरोपींना आणत असताना त्यांनी पोबारा केला.
वन विभागाच्या कार्यालयात सापासह टोपली आणून जप्त करण्यात आली. येथील सर्पमित्र असलम शहा यांना बोलावून पकडलेल्या सापाची शहानिशा करण्यात आली. ‘दिवड’ नावाचा हा पाण्यात राहणारा बिनविषारी साप असल्याचे त्याने हाता-पायाला चावा घेतल्यास तो सोडत नसल्याचे आणि ओढून काढल्यास खोलवर जखम होत असल्याची माहिती असलम शहा यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.
हा साप अप्पर वर्धा धरण परिसरातील पाण्यात सोडण्यात येणार असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. साप पकडून त्याचा खेळ मांडण्याचा प्रकार हा वन वन्य जीव संरक्षण अधिनियम खाली गुन्हा ठरतो. मात्र वृत्त लिहिस्तोवर कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.