१०० क्विंटलवर तूर विकणाऱ्यांची मागविली यादी
By Admin | Updated: April 14, 2017 00:07 IST2017-04-14T00:07:20+5:302017-04-14T00:07:20+5:30
शेतकऱ्यांच्या आडून तुरीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने चांगलाच फास आवळला आहे.

१०० क्विंटलवर तूर विकणाऱ्यांची मागविली यादी
व्यापाऱ्यांभोवती आवळला फास : सर्व १० केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अमरावती : शेतकऱ्यांच्या आडून तुरीची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने चांगलाच फास आवळला आहे. आतापर्यंत शासकीय तूर खरेदी केंद्रावर एकाच सातबाऱ्यावर १०० क्विंटलपेक्षा अधिक तुरीची विक्री करणाऱ्या शेतकरी कम व्यापाऱ्याच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ मागविल्या आहेत.
व्यापाऱ्यांद्वारा खुल्या बाजारात चार हजार रूपये क्विंटलने शेतकऱ्यांची तूूर विकत घेऊन शासकीय खरेदी केंद्रावर ५०५० रूपये दराने ती विकण्याचा गोरखधंदा व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. याविषयीच्या तक्रारी पालकमंत्र्यांसह राज्याच्या मुुख्यमंत्र्यांना प्राप्त झाल्याने शासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षकांना त्यांच्या अधिनस्थ यंत्रणेद्वारे व्यापाऱ्यांना हुडकून काढण्याचे निर्देश दिलेत. बुधवारी अमरावती बाजार समितीमध्ये असलेल्या शासकीय तूर खरेदी केंद्रावर पथकाने पाहणी केल्याची माहिती आहे.
प्रभारी जिल्हाधिकारी के. पी. परदेशी यांनी शासकीय तूर खरेदी केंद्रावर १०० क्विंटलपेक्षा अधिक तुरीची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या मागविल्या आहेत. संबंधित शेतकऱ्याकडे असलेल्या सातबाऱ्यावरील तुरीचे क्षेत्र व त्याची सरासरी उत्पादकता याआधारे आता शेतकऱ्यांच्या नावाआड तूर विकणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईचा फास आवळला जाणार आहे. (प्रतिनिधी)